Syrian civil war: गातील सर्वात जुने व ऐतिहासिक शहर असलेले सिरियातील अलेप्पो शहर सध्या गृह युद्धांमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. सीरियातील विरोधी बंडखोर गटांनी अलीकडेच अलेप्पोवर भीषण हल्ला केला असून हे शहर सरकारी नियंत्रणातून ताब्यात घेतले. सिरियाचे राष्ट्रपती बशर अल असद यांचे लष्कर या हल्ल्याला तोंड देऊ शकले नाही. त्यामुळे बंडखोरांनी अलेप्पोवर सहज ताबा मिळवला, हा हल्ला दोन दिशांनी करण्यात आला. बंडखोर गटांनी हामा प्रांत आणि इदलिबच्या आसपासच्या ग्रामीण भागातही आपले स्थान मजबूत केले आहे.
हे हल्ले हयात तहरीर व अल-शाम (एचटीएस) या दहशतवादी संघटनेच्या गटाने केले असून या दोन्ही संघटनांना अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. हा गट पूर्वी अल कायदाचा एक घटक होता. परंतु २०१६ मध्ये हा गट अल-कायदापासून वेगळा झाला. याशिवाय नॅशनल कोलिशन ऑफ सिरियन रिव्होल्यूशन आणि अपोझिशन फोर्सेसने इदलिबच्या उत्तरेकडून आणखी एक हल्ला अलेप्पोवर करण्यात आला. या हल्ल्यात तुर्कीसमर्थित सीरियन नॅशनल आर्मी किंवा फ्री सीरियन आर्मीचाही समावेश आहे.
या हल्ल्याच्या वेळेमागे अनेक कारणे होती. लेबनॉनमध्ये नुकतीच झालेली शस्त्रसंधी : इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील शस्त्रसंधीमुळे बंडखोरांना आपली रणनीती अंमलात आणण्याची संधी मिळाली.
रशिया-युक्रेन युद्ध : रशिया हा सीरियाच्या असद सरकारचा मुख्य समर्थक असून सध्या रशिया युक्रेन युद्धात गुंतला आहे. यामुळे बंडखोरांना आणखी एक संधी मिळाली.
इराण आणि हिजबुल्लाहची कमकुवतता : इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमुळे इराणसमर्थित सैन्य आणि हिजबुल्लाह या संघटना देखील कमकुवत झाल्या आहेत. यामुळे बंडखोरांना मोठी संधी मिळाली आणि त्यांनी अलेप्पोवर हल्ले करण्यास सुरुवात केली.
अलेप्पो हे सीरियातील दुसरे सर्वात मोठे शहर व ऐतिहासिक व्यापारी केंद्र आहे. बंडखोर आणि सरकारी दलांसाठी सामरिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून या शहराचा ताबा अत्यंत महत्त्वाचा आहे. २०१६ मध्ये रशियाच्या मदतीने असद सरकारने बंडखोरांकडून अलेप्पोतून हद्दपार केले होते. मात्र आता बंडखोरांनी या शहरावर पुन्हा ताबा मिळवला आहे. असद यांच्या सरकारसाठी हा मोठा धक्का आहे.
सरकार समर्थक देश :
रशिया : असद सरकारचा सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय समर्थक देश आहे.
इराण : इराणने नुकतेच शेकडो लढाऊ सैनिक सिरियात असद यांच्या मदतीसाठी पाठवले आहेत.
हिजबुल्लाह : उत्तर सीरियात सैन्य पाठवण्याची सध्या कोणतीही योजना नाही. पण हिजबुल्लाह हा असद सरकारचा समर्थक मानला जातो.
तुर्कस्तान हा बंडखोर गटांना पाठिंबा देतो आणि वायव्य सीरियात तुर्कीने सैन्य तैनात केले आहे.
इतर देश: अमेरिकेचा कुर्दिशप्रणित सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सेस (एसडीएफ) ला पाठिंबा आहे.
इस्रायल हा प्रामुख्याने सीरिया, विशेषत: इराण आणि हिजबुल्लाहच्या तळांवर हवाई हल्ले करत आहे.
अलेप्पोवरील ताज्या घडामोडी सीरियातील यादवी युद्धाला कलाटणी देणारी ठरू शकतात. बंडखोरांना रोखण्यात सरकारला अपयश आल्यास सत्तासमीकरणात मोठा बदल होऊ शकतो. अमेरिका रशिया यांच्या हस्तक्षेपामुळे व सामरिक हितसंबंधांमुळे हा संघर्ष आणखी गुंतागुंतीचा झाला आहे.
सीरिया एकेकाळी मध्यपूर्वेचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक केंद्र मानले जात होते, परंतु आज ते गृहयुद्धात अडकून पडले आहे. या युद्धाचा फटका केवळ या देशालाच नाही तर संपूर्ण जगाला बसला आहे. २०११ मध्ये सुरू झालेला हा संघर्ष आजही सुरू असून त्याचे बहुआयामी परिणाम होत आहेत.
२०११ मध्ये जेव्हा 'अरब स्प्रिंग'ने ट्युनिशिया, इजिप्त आणि लिबियामध्ये राजकीय बदल घडवून आणले, तेव्हा त्याचा परिणाम सीरियावरही झाला. लोकशाही, स्वातंत्र्य आणि भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले. हे आंदोलन सर्वप्रथम दक्षिणेकडील दारा शहरात दिसून आले, जिथे भिंतीवर सरकारविरोधी घोषणा लिहिल्याबद्दल काही मुलांना अटक करण्यात आली आणि त्यांचा छळ करण्यात आला. या मुलांच्या अटकेविरोधात शांततेत निदर्शने झाली, पण सरकारच्या हिंसक प्रतिक्रियेमुळे हे आंदोलन आणखी चिघळले. हे आंदोलन देशभर पसरले आणि लोकशाहीच्या मागणीचे राजकीय उठावात रूपांतर झाले.
सीरियातील यादवी युद्ध गुंतागुंतीचे आहे, कारण त्यात अनेक बंडखोर गटांचा समावेश आहे, ज्यांची उद्दिष्टे आणि हितसंबंध भिन्न आहेत.
अध्यक्ष बशर अल असद यांनी सत्तेत राहण्यासाठी आपली सर्व शक्ति हे आंदोलन दडपण्यासाठी वापरली. असद यांना रशिया, इराण सारख्या बलाढ्य देशांचा पाठिंबा मिळाला.
तर फ्री सीरियन आर्मी (एफएसए) या बंडखोर गटासारखे विरोधी गट लोकशाही आणि असद राजवट संपुष्टात आणण्याची मागणी करत होते.
इसिस आणि इतर दहशतवादी संघटनांनी आपला प्रभाव वाढवण्यासाठी या संघर्षाचा फायदा घेतला. सीरिया आणि इराकचा मोठा भाग काबीज करून नवी आघाडी उघडली.
कुर्दिश पीपल्स प्रोटेक्शन युनिट्सने (वायपीजी) केवळ इसिसशी लढा दिला नाही, तर त्याच्या स्वायत्ततेची मागणीही केली. त्यांना अमेरिकेचा पाठिंबा होता.
रशियाने असद सरकारला पाठिंबा दिला आणि हवाई हल्ले केले. अमेरिकेने बंडखोर गट आणि कुर्दिश सैन्याला मदत केली. तुर्कस्तानने कुर्दिश सैन्याविरुद्ध आपली लढाई लढली.
या गृहयुद्धात आता पर्यंत ५० लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. एक कोटींहून अधिक लोकांना आपली घरे सोडून निर्वासित व्हावे लागले. लाखो मुले शिक्षणापासून आणि चांगल्या भविष्यापासून वंचित राहिली. सीरियाची अर्थव्यवस्था कोलमडली असून तेल, शेती आणि व्यापार ही क्षेत्रे पूर्णपणे नष्ट झाली आहे.
यादवी युद्धामुळे सीरियाचे अनेक भाग झाले आहेत. असद सरकारने देशाचा मोठा भाग पुन्हा ताब्यात घेतला आहे, परंतु हा देश अस्थिर आहे. इसिसचा धोका कमी झाला असला तरी पूर्णपणे संपलेला नाही. लाखो निर्वासितांना पुन्हा सिरियामध्ये परत यायचे आहे. परंतु त्यांची घरे, शाळा आणि जीवन पुन्हा पूर्वस्थितीत येण्यासाठी अनेक दशके लागू शकतात. राजकारण, मानवी हक्क आणि परराष्ट्र शक्तींचे हितसंबंधामुलेया देशाची अनेक गटांनी विभागणी केली आहे. याच सर्वाधिक फटका सर्वसामान्य जनतेला सहन करावालागला आहे.
अलेप्पो हे ऐतिहासिक शहर असले तरी ते या युद्धाचे मुख्य केंद्र बनले आहे. असद सरकार आणि बंडखोरांमध्ये झालेल्या भीषण लढाईमुळे हे शहराचे भग्नावशेषात रूपांतर झाले आहे.
अलेप्पोला अरबी भाषेत हलाब म्हणतात. हे शहर जगातील सर्वात जुन्या लोकवस्तीच्या शहरांपैकी एक मानले जाते. इ.स.पू. ४३०० पासून या शहराचे अस्तित्त्व आहे. या शहराचा प्राचीन इतिहास मेसोपोटेमिया, हित्ती साम्राज्य, असिरियन साम्राज्य, पर्शियन साम्राज्य आणि रोमन साम्राज्यात पसरलेला आहे. सिल्क रोडचे व्यापारी केंद्र म्हणूनही अलेप्पो शहराची ओळख होती. प्राचीन काळी अलेप्पोचा उल्लेख सर्वप्रथम अक्काडियन नोंदींमध्ये करण्यात आला होता. हे हित्तीलोकांचे एक प्रमुख शहर होते आणि नंतर ते असिरियन आणि बॅबिलोनियन साम्राज्यांचा भाग बनले. ग्रीक आणि रोमन युगांनंतर, अलेक्झांडर द ग्रेटच्या विजयानंतर अलेप्पो सेल्युसिड साम्राज्याचा भाग बनला. त्यानंतर ते रोमन साम्राज्य आणि नंतर बायझंटाईन साम्राज्याच्या नियंत्रणाखाली आले. सातव्या शतकात मुस्लिमांनी या शहरावर ताबा मिळवला. तो उमय्या आणि अब्बासी खलिफांच्या अधिपत्याखाली राहिला. बाराव्या शतकात नूर-अल-दीन जुंगी यांच्या हाताखाली हे शहर एक महत्त्वाचे इस्लामी सांस्कृतिक केंद्र बनले. इ.स. १५१६ मध्ये ऑटोमन साम्राज्य ऑटोमन साम्राज्याचा भाग बनले. साम्राज्यांतर्गत व्यापारी व सांस्कृतिक केंद्र म्हणून त्याचा विकास झाला.
विसाव्या शतकात फ्रान्सच्या नियंत्रणानंतर अलेप्पो स्वतंत्र सीरियाचा भाग बनला. अलेप्पोचा इतिहास तेथील सांस्कृतिक आणि व्यापारी वारसा प्रतिबिंबित करतो, तर सीरियातील यादवी युद्ध या प्रदेशातील राजकीय आणि सामाजिक आव्हानांची गुंतागुंत अधोरेखित करते. हा संघर्ष आजही लाखो लोकांच्या जीवनावर परिणाम करत आहे.
सीरियात मुस्लिमांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचे कारण केवळ धार्मिक मतभेद नाही. हा संघर्ष गुंतागुंतीचा आहे. ज्यात राजकीय सत्ता, बाह्य हस्तक्षेप आणि सामाजिक विषमता ही या गृहयुद्धाची प्रमुख कारणे आहेत. सीरियात सुन्नी आणि शिया असे दोन प्रमुख पंथ आहेत. राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद आणि त्यांच्या सरकारला अलावी समुदायाकडून (शिया संप्रदायाचा भाग) पाठिंबा मिळतो, तर बहुतेक बंडखोर सुन्नी समुदायाचे आहेत. या धार्मिक मतभिन्नतेमुळे हा संघर्ष चिघळला आहे. पण हे केवळ वरवरचे कारण आहे. त्यात राजकीय कारण आघाडीवर आहे.
राष्ट्राध्यक्ष असद यांचे सरकार १९७१ पासून सत्तेत आहे. अल्पसंख्याक अलावी समाजाच्या पाठिंब्यावर ही राजवट चालत आहे. २०११ मध्ये 'अरब स्प्रिंग'च्या वेळी जेव्हा सिरियन नागरिकांनी लोकशाही हक्कांची मागणी केली, तेव्हा असद सरकारने आंदोलकांवर दडपशाही सुरू केली. त्यानंतर त्याचे गृहयुद्धात रूपांतर झाले, जिथे बंडखोर गटांनी असद सरकार उलथवून टाकण्याचे अनेक प्रयत्न केले आहेत. शिवाय, सीरियातील संघर्ष हा केवळ देशांतर्गत प्रश्न नाही. यात अनेक बाह्य शक्तींचा समावेश आहे. रशिया आणि इराण असद सरकारला पाठिंबा देतात. तुर्कस्तान आणि अमेरिका बंडखोर गटांना पाठिंबा देतात. इस्लामिक स्टेट (इसिस) आणि इतर दहशतवादी संघटनांनी या परिस्थितीचा फायदा घेत हा संघर्ष आणखी चिघळत ठेवला आहे.
सीरियातील विविध भागात तेल, पाणी आणि इतर संसाधनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक गटात लढाया सुरू आहेत. बंडखोर गट आणि सरकार या दोघांनाही सामरिक क्षेत्रे आपल्या नियंत्रणाखाली ठेवायची आहेत. इसिस आणि अल कायदासारख्या संघटनांनी सिरियन संघर्षाचा फायदा घेऊन आपला अजेंडा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मतांशी सहमत नसलेल्या मुस्लिमांनाही या संघटनांनी लक्ष्य केले.
संबंधित बातम्या