पुणे : गर्भाशय कर्करोग या गंभीर आजारावर सीरमने लस तयार केली असून यामुळे अनेक रुग्णांना जीवदान मिळणार आहे. 'क्वाड्रिव्हॅलेंट ह्युमन पॅपिलोमाव्हायरस' असे या स्वदेशी लसीचे नाव आहे. दरम्यान ही लस या पूर्वी परदेशातून मागवण्यात येत होती. यामुळे या लशीची किंमत जास्त होती. मात्र, देशात ही लस तयार झाल्याने ती कितीला मिळणार या बद्दल उत्सुकता होती. ही लस कितीला मिळणार या बाबत सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी माहिती दिली आहे.
या बाबत माहिती देताना पूनावाला म्हणाले, गर्भाशयाच्या कर्करोगावरील लसीची किंमत ही २०० ते ४०० रुपयांच्या दरम्यान असू शकते. मात्र, अद्याप किंमत निश्चित केलेली नाही. ही लस प्रथम आपल्या देशाला देण्यात येणार आहे. त्यानंतर जगातील इतर देशांना देण्यात येणार असल्याची माहिती देखील अदर पुनावाला यांनी दिली. २ वर्षांत २०० दशलक्ष डोस तयार करण्याची तयारी असल्याचेही पुनावाला यांनी सांगितले.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि बायोटेक्नॉलॉजी विभागा ही लस आज पासून खुली करण्याची शक्यता आहे. या लसीला DCGI ने १२ जुलैला मार्केट ऑथरायझेशन दिले होते. या आजारावरील प्रभावी लस ही बाहेरील देशातून मागवली जात होती. मात्र, ही लस आता देशातच मिळणार असल्याने गर्भाशयाच्या रुग्णांना जीवदान मिळणार आहे.
गर्भाशयाच्या कर्करोग हा ग्रीवाच्या पेशींमध्ये होतो. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हा विषाणू गर्भाशयाच्या कर्करोगासाठी कारणीभूत ठरतो. ही लस ९ ते १४ वयोगटातील मुलींना दिली जाऊ शकते. भारतात गर्भाशयाच्या कर्करोगाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढले आहे. विशेषत: हा रोग १५ ते ४४ वयोगटातील महिलांमध्ये होण्याची जास्त शक्यता असते. मात्र, या स्वदेशी लसीमूळे यावर नियंत्रण ठेवले जाऊ शकते. भारतात दरवर्षी अनेक महिलांचा गर्भाशयाच्या कर्करोगानं मृत्यू होतो. हा घातक आजार असून या वर ठोस असे औषध उपलब्ध नव्हते. त्यामुळे सीरमला या क्षेत्रात मिळालेले हे मोठे यश आहे.
संबंधित बातम्या