मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  पाकिस्तानमध्ये विधानसभा उपाध्यक्षांची कमाल; अल्पमतातील उमेदवार झाला मुख्यमंत्री

पाकिस्तानमध्ये विधानसभा उपाध्यक्षांची कमाल; अल्पमतातील उमेदवार झाला मुख्यमंत्री

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jul 23, 2022 01:31 PM IST

Pakistan News : पाकिस्तानमधील पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री शाहबाझ शरीफ हे देशाचे पंतप्रधान झाल्यामुळं तेथील विधानसभेत नवीन मुख्यमंत्री म्हणून त्यांचा मुलगा हमजा शरीफ यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीदरम्यान मोठा राजकीय थरार पाहायला मिळाला.

Punjab Legislative Assembly In Pakistan
Punjab Legislative Assembly In Pakistan (HT)

Punjab Legislative Assembly In Pakistan : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुख्यमंत्री निवडण्यासाठी घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. कारण विधानसभेत बहुमत नसतानाही मुस्लिम लीग पक्षाचे उमेदवार आणि शाहबाझ शरीफ यांचे पुत्र हमजा शरीफ यांनी बहुमत सिद्ध करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळं या घटनाक्रमाविरोधात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तहरिक ए इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इमरान खान यांनी प्रोटेस्ट करण्याची घोषणा केली आहे.

नेमकं काय घडलं पंजाब विधानसभेत?

पंजाबमध्ये मुख्यमंत्र्यांची निवड करण्यासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत विधानसभा उपाध्यक्षांनी इमरान खान यांच्या पक्षाच्या १० आमदारांचं मत बाद ठरवलं, परिणामी बहुमत नसतानाही मुस्लिम लीग पक्षाचे हमजा शरीफ यांनी ३ मतांच्या आघाडीनं बहुमत सिद्ध करत मुख्यमंत्रीपद मिळवलं. न्यायालयाच्या निर्देशानुसार पंजाब विधानसभेत मतदान घेण्यात आलं होतं.

इमरान खान यांच्या पक्षानं या निकालाविरोधात पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना इमरान खान म्हणाले, आमचं सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडं लक्ष आहे, देशात लष्करशाही नसून लोकशाही आहे, नैतिकता त्याचा आधार असायला हवा, त्याचबरोबर त्यांनी या निवडणुकीत सत्ताधारी पक्षांनी मोठ्या प्रमाणात घोडेबाजार केल्याचा आरोपही केला आहे.

माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी हे पाकिस्तानला गेल्या तीस वर्षांपासून लुटत आहेत, त्यांनी ब्लॅक मनी वापरून देशातील लोकशाहीची अंत्ययात्रा काढल्याचा आरोप इमरान खान यांनी झरदारींवर केला. त्याचबरोबर त्यांनी विधानसभेतील या प्रकाराबाबत देशातील लोकांना शांततेनं निषेध नोंदवण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

विरोधकांची १० मतं उपाध्यक्षांनी ठरवली बाद...

पंजाब प्रांतातील विधानसभेच्या उपाध्यक्षांनी इमरान खान यांच्या पक्षाच्या १० आमदारांचं मत बाद ठरवल्यानंतर मुस्लिम लीगच्या उमेदवारानं बहुमत मिळवलं. त्यानंतर विजयी झालेल्या हमजा शरीफ यांना राज्याच्या गव्हर्नर यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली.

कुणाला किती मतं मिळाली?

इमरान यांच्या तहरिक ए इन्साफ आणि पीएमएल-क्यू पक्षाचे समर्थित उमेदवार परवेझ इलाही यांना १८६ मतं मिळाली होती, तर हमजा शरीफ यांना १७९ मतं मिळाली. परंतु विधानसभा उपाध्यक्षांनी इमरान यांच्या आघाडीच्या १० मतांना बाद ठरवल्यानं बहुमताचा आकडा १७६ वर आला, त्यामुळं हमजा यांचा विजय झाला. यावर पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि पीटीआयचे उपाध्यक्ष शाह महमूद कुरेशी यांनी विधानसभेच्या उपाध्यक्षांनी घेतलेल्या या निर्णयावर जोरदार टीका केली आहे.

पाकिस्तानमध्ये राजकीय वादंग...

माजी पंतप्रधान आणि मुस्लिम लीगच्या नेत्या आणि नवाझ शरीफ यांची कन्या मरियम नवाझ यांचं वैर जगजाहिर आहे. पंजाब विधानसभेत पुतण्या मुख्यमंत्री झाल्यानंतर मरियम नवाझ यांनी 'जशास तसे' म्हणत इमरान खान यांना डिवचलं आहे. तर इमरान यांच्यासहित पीटीआयच्या नेत्यांनी शाहबाझ शरीफ यांच्यासह मुस्लिम लीगच्या नेत्यांवर टीकेची झोड उठवली आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या