मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  राज्यातील सत्तासंघर्षात मोठा ट्वीस्ट, नाना पटोलेंची अध्यक्षपदी नियुक्ती करा; ठाकरे गटाची मागणी

राज्यातील सत्तासंघर्षात मोठा ट्वीस्ट, नाना पटोलेंची अध्यक्षपदी नियुक्ती करा; ठाकरे गटाची मागणी

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Feb 22, 2023 07:56 PM IST

Maharashtra Political Crisis : आमदारांना अपात्र करण्याचे अधिकार अध्यक्षांनाच असल्याचं सरन्यायाधीशांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता ठाकरे गटानं नवी मागणी केली आहे.

Maharashtra Political Crisis
Maharashtra Political Crisis (HT)

Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणात आता नवा ट्वीस्ट आला आहे. कारण आता शिंदे गटाच्या आमदारांवरील अपात्रतेचा निर्णय घेण्यासाठी जुन्या अध्यक्षांची (नाना पटोले) यांची पुन्हा नियुक्ती करण्याची मागणी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात केली आहे. काल झालेल्या सुनावणीत आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार हा केवळ विधानसभेच्या अध्यक्षांनाच असल्याची टिप्पणी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केली होती. त्यानंतर आता आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे द्या नाहीतर जुन्या अध्यक्षांची नव्यानं नियुक्ती करा, अशी मागणी ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात करण्यात आली आहे. त्यामुळं आता यावर सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाकडून युक्तिवाद करताना कपिल सिब्बल म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर ते सूरतमार्ग गुवाहाटीत गेले, त्यानंतर शिंदे यांनी तेथून भारत गोगावले यांची प्रतोदपदी निवड केली. तिथं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित नव्हते. त्यामुळं भारत गोगावले यांचा व्हीप लागू होणार नसल्याचा युक्तिवाद ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. सभागृहातील आमदार हे शिवसेना पक्षाचे आवाज होते. त्यांना कोणताही निर्णय हा पक्षप्रमुख यांनाच विचारून घ्यावा लागतो. बंडखोर शिंदे गटानं व्हीपबद्दलचे निर्णय केवळ एका मेलवरून कसे काय केले?, असाही सवाल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात उपस्थित केला आहे.

नाना पटोले यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड करा- सिब्बल

शिवसेनेच्या आमदारांना अपात्र करण्याचे अधिकार हे केवळ विधानसभेच्या अध्यक्षांनाच असल्याचं सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल बोलताना म्हणाले की, आमदारांना अपात्र करण्याचे अधिकार हे विधानसभेच्या उपाध्यक्षांनाच असायला हवेत. तसं होणार नसेल तर आधीच्या जुन्या अध्यक्षांची पुन्हा नियुक्ती करून हा निर्णय मार्गी लावायला हवा, अशी मागणी ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात करण्यात आली आहे.

WhatsApp channel