भारतीय रेल्वे दहशतवाद्याचं टार्गेट ! एकाच आठवड्यात गाड्या उलटवण्याच्या ४ घटनांमुळे चिंता वाढली-terrorist connection in train accidents why railway and agencies in fear ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  भारतीय रेल्वे दहशतवाद्याचं टार्गेट ! एकाच आठवड्यात गाड्या उलटवण्याच्या ४ घटनांमुळे चिंता वाढली

भारतीय रेल्वे दहशतवाद्याचं टार्गेट ! एकाच आठवड्यात गाड्या उलटवण्याच्या ४ घटनांमुळे चिंता वाढली

Sep 10, 2024 01:07 PM IST

terrorist connection in train accidents : उत्तर प्रदेशपासून राजस्थानपर्यंत दहशतवादविरोधी पथके आणि स्थानिक पोलिसही रेल्वे घातपात प्रकरणी सक्रिय झाले आहेत. या घटनांमुळे सुरक्षा यंत्रणांचे टेंशन वाढलं आहे.

भारतीय रेल्वे दहशतवाद्याचं टारगेट! एकाच आठवड्यात गाड्या उलटवण्याच्या ४ घटनांमुळे चिंता वाढली
भारतीय रेल्वे दहशतवाद्याचं टारगेट! एकाच आठवड्यात गाड्या उलटवण्याच्या ४ घटनांमुळे चिंता वाढली (PTI)

terrorist connection in train accidents : यूपीमधील कानपूर येथे रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलेंडर ठेवल्याची घटना ताजी असतांना राजस्थानमधील अजमेर येथे रेल्वे ट्रॅकवर सीमेंटचे मोठे ब्लॉक ठेवण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या आठवडाभरात अशा ४ घटना घडल्याने दहशतवादी आता ट्रेन उलटवण्याचा कट रचत असल्याची माहिती तपास यंत्रांना मिळाली आहे. या प्रकरणांमुळे रेल्वे प्रशासानात खळबळ उडाली आहे. सुरक्षा यंत्रणा या प्रकरणी दक्षता घेत आहेत. यूपीपासून राजस्थानपर्यंत दहशतवादविरोधी पथके आणि स्थानिक पोलिसही या प्रकरणी तपास करण्यास सक्रिय झाले आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, अशा घटना चिंताजनक आहे.

रविवारी संध्याकाळी कानपूर येथे गॅस सिलिंडर व काही स्फोटकं रेल्वे रुळावर ठेवण्यात आले होते. ही बाब वेळीच चलकाच्या लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली. ड्रायव्हरने वेळीच इमर्जन्सी ब्रेक लावल्याने मोठी हानी टळली. कानपूरमधील घटनास्थळावरून पेट्रोल आणि माचिसच्या काड्याही जप्त करण्यात आल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे यामागे दहशतवादी कारस्थान असण्याची शंका बळावली आहे. वास्तविक, नुकताच पाकिस्तानस्थित दहशतवादी फरहातुल्ला घोरीने एक व्हिडिओ व्हायरल केला होता. यामध्ये त्याने दहशतवाद्यांना मोठ्या प्रमाणावर रेल्वे ट्रॅक लक्ष करून देशातील पुरवठा साखळीला लक्ष्य करण्याचा फतवा काढला होता. यामुळे भारतातील पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान करण्याचा हेतु स्पष्ट झाला होता.

अजमेरमध्येही रेल्वेट्रॅकवर सीमेंट ब्लॉक

राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यात वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या रुळांवर सिमेंटचे दोन ब्लॉक टाकून मालगाडी रुळावरून घसरण्याचा प्रयत्न करण्यात आला. रेल्वे अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले की, ७० किलो वजनाच्या या सीमेंट ब्लॉकवर एक मालगाडी ब्लॉकवर आदळली. सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरवर रविवारी काही समाजकंटकांनी ट्रॅकवर सिमेंटचे दोन ब्लॉक ठेवले होते. यातील एका ब्लॉकला एका मालगाडीने धडक दिली,' अशी माहिती उत्तर पश्चिम रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिली. फुलेरा-अहमदाबाद मार्गावर वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या सारधना आणि बनगड स्थानकांदरम्यान ही घटना घडली. फ्रेट कॉरिडॉरच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

गेल्या वर्षभरात १७ घटना उघड

गेल्या वर्षी जूनपासून अशी १७ प्रकरणे उघडकीस आल्या आहेत. ज्यात जाडजूड लाकूड, दगड, गॅस सिलिंडर इत्यादी रेल्वे रुळांवर ठेवण्यात आल्याचं निष्पन्न झालं आहे. या सोबतच सिग्नल यंत्रणेशी छेडछाड करून अपघात करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याशिवाय, अनेक सोशल मीडिया वापरणाऱ्यांकडून देखील ट्रॅकचा बेकायदेशीर वापर केल्याच्या घटना उघड झाल्या आहेत. ज्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता होती. या सर्व प्रकरणी आरपीएफने गुन्हे दाखल केले असून तपास सुरू आहे. याशिवाय संवेदनशील भागात ट्रॅकचे पूर्ण निरीक्षण केले जात आहे. एवढ्या लांब मार्गावरील रुळांची सखोल तपासणी करणे शक्य नसून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अनेक प्रकरणात अल्पवयीनांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणांमध्ये दहशतवादी कारस्थान असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे रेल्वे सूत्रांचे म्हणणे आहे. कानपूरमध्ये ही घटना उघडकीस येताच दहशतवादविरोधी पथकही घटनास्थळी पोहोचले. नुकतीच महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये रेल्वे रुळावर सीमेंटचे ब्लॉक टाकल्याची घटना समोर आली होती. येथेही चालकाच्या सतर्कतेमुळे अपघात टळला. याशिवाय गेल्या आठवडाभरात वंदे भारत एक्सप्रेससह दोन गाड्यांवर दगडफेक झाली. या घटनांमुळे रेल्वेच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे.

Whats_app_banner