Terror Threat to PM Modi's Aircraft : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या फ्रांस दौऱ्यावर आहेत. या दरम्यान, त्यांच्या विमानावर दहशतवादी हल्ला होणार असल्याचा फोन मुंबई पोलिसांना मंगळवारी आला. या फोनमुळे खळबळ उडाली असून मुंबई पोलिसांनी चेंबूर येथून एका व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीची चौकशी सुरू आहे. तसेच पोलिस तपास करत आहेत.
पंतप्रधान मोदी सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर असून त्यानंतर ते अमेरिकेला जाणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यापूर्वी मंगळवारी मुंबई पोलिसांना एक फोन आला. यात मोदी यांच्या विमानावर दहशतवादी हल्ला होणार असल्याचं सांगण्यात आलं. या फोन कॉलमुळे पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या. त्यांनी हा फोन कोठून आला याचा तपास सुरू केला. या कॉलप्रकरणी मुंबई पोलिसांनी चेंबूर परिसरातून एका व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीने मंगळवारी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर जात असताना त्यांच्या विमानावर दहशतवादी हल्ला होणार असल्याची माहिती दिली.
पोलिसांनी या फोनची गांभीर्याने दखल घेतली. याची माहिती इतर सुरक्षा यंत्रणांना देण्यात आली. तसेच या प्रकरणाचा तपास देखील सुरू करण्यात आला. मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीला अटक केल्यावर तो मानसिक दृष्ट्या आजारी असल्याच समोर आलं. या पूर्वी देखील मुंबईत शाळा, कॉलेज, एयरपोर्टवर बॉम्ब हल्ला होण्याचे अनेक फोन कॉल्स मुंबई पोलिसांना मिळाले आहे. त्यामुळे संपूर्ण यंत्रणा वेठीस धरल्या जात आहे.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या अध्यक्ष पदाच्या कालावधीत भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्याचे व हे संबंध उंचीवर नेण्याची मोठी संधी असून त्या दृष्टीने हा अमेरिका दौरा असेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले. आज ते फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. त्यानंतर दोन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर पंतप्रधान मोदी जाणार आहेत. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून आपण फ्रान्सच्या दौऱ्यावर असल्याचे त्यांनी सांगितले.
संबंधित बातम्या