हैदराबादमधील टप्पाचबुतरा परिसरातील एका मंदिर परिसरात असलेल्या शिवलिंगाजवळ मांसाचा तुकडा आढळून आल्याने खळबळ माजली आहे. स्थानिकांना माहिती मिळताच मोठ्या संख्येने लोक मंदिराजवळ जमा झाले आणि त्यांनी विरोध प्रदर्शन सुरू केले. घटनेची माहिती मिळताच भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत स्थानिकांसह निदर्शने केली. लोकांनी पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे टप्पाचबुतरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हनुमान आणि शिव मंदिराच्या आवारात ही घटना घडली. या घटनेचा तपास पोलिसांची चार पथके करत आहेत. मंदिर समितीच्या एका सदस्याने सांगितले की, शिवलिंगाजवळ कोणीतरी मांस फेकले आणि जेव्हा भाविकांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी याची माहिती दिली. या घटनेच्या निषेधार्थ भाजयुमोच्या कार्यकर्त्यांसह स्थानिकांनी मंदिरासमोर जमून निदर्शने केली. आंदोलकांनी घोषणाबाजीही केली.
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने पत्रकारांना सांगितले की, मंदिरात मांसाचे तुकडे सापडल्याची माहिती मिळाली असून ते सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासले जात आहे. या कृत्यात काही गुंडांचा सहभाग असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. परिस्थिती शांत असून आम्ही परिस्थितीचा आढावा घेत आहोत. मांसाचे हे तुकडे येथे कसे आले याची पुष्टी अद्याप झालेली नाही. ते एखाद्या प्राण्याने किंवा व्यक्तीने येथे आणले असावे किंवा एखाद्या मनोरुग्ण व्यक्तीने आणले असावे. हे तपासात समोर येईल.
या घटनेच्या विविध पैलूंचा आम्ही तपास करत आहोत. याचा खुलासा लवकरच होणार आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मंदिराजवळ जादा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या