कर्नाटकपाठोपाठ तेलंगणमध्ये प्रचारादरम्यान पडद्यामागे काम करून कॉंग्रेसला सत्ता मिळवून देणारे पोल स्ट्रॅटेजिस्ट सुनील कानुगोलू यांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सुनील कानुगोलू हे कॉंग्रेससाठी ‘मिडास टच’ असलेला रणनितीकार ठरत असल्याचे राजकीय क्षेत्रात बोलले जात आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तर कानुगोलू यांना त्यांच्या सरकारमध्ये थेट कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा दिलाय. तेलंगणमध्ये कानुगोलू यांनी के चंद्रशेखर राव यांचा पराभव करण्यासाठी कॉंग्रेस नेते रेवंथ रेड्डींसोबत मिळून काँग्रेसची रणनीती आखून सरकारचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला होता. रेवंत रेड्डी आणि कानूगोलू यांच्या भक्कम जोडीच्या व्यूहरचनेचा परिणाम म्हणजे तेलंगणमध्ये ११९ पैकी कॉंग्रेसने ६४ जागा जिंकल्याचे बोलले जाते.
विशेष म्हणजे, कॉंग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाच्या सांगण्यावरून कानुगोलू यांना प्रचाराची रणनिती आखण्यासाठी राजस्थान आणि मध्य प्रदेशात पाठवण्यात आलं होतं. परंतु राजस्थानमध्ये अशोक गेहलोत आणि मध्य प्रदेशात कमलनाथ या स्थानिक मातब्बर नेत्यांनी त्यांना जवळ केलं नव्हतं, हे आता उघडपणे बोलल्या जात आहे. गेहलोत आणि कमलनाथ या दोन्ही कॉंग्रेस नेत्यांनी सुनील कानुगोलू यांचा सल्ला मानण्यास स्पष्ट नकार दिला होता, अशी माहिती एका कॉंग्रेस नेत्याने दिली आहे. या नेत्यांमध्ये निवडणुकीपूर्वी विजयाबद्दल अती आत्मविश्वास निर्माण झाला होता. राजस्थानमध्ये कानुगोलू यांना दूर सारत विधानसभा निवडणुकीचं प्रचार धोरण तयार करण्यासाठी अशोक गेहलोत यांनी नरेश अरोरा यांच्या ‘डिझाईनबॉक्स’ कंपनीला कंत्राट दिलं होतं.
तेलंगणमध्ये रेवंथ रेड्डी यांनी कानुगोलू यांच्या टीमला मुक्तहस्ते काम करण्याची मुभा दिली होती. परिणामी रेवंत रेड्डी यांच्यासोबत कानुगोलू यांनी तेलंगणमध्ये लक्ष्य केंद्रीत करून पक्षाला दणदणीत विजय मिळवून दिल्याचं सांगितलं जातं.
सुनील कानुगोलू हे मूळचे कर्नाटकचे आहेत. कर्नाटकात काँग्रेसच्या विजयामागे कानुगोलू यांची स्ट्रॅटजी महत्वाची मानली जाते. कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई सरकारचा भ्रष्टाचार मांडण्यासाठी त्यांनी प्रचारादरम्यान राबवलेली PayCM ही जाहिरात मोहीम प्रभावी ठरली होती. तेलंगणमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान कानुगोलू यांनी कॉंग्रेसच्या गॅरंटी योजनांसोबतच के चंद्रशेखर राव सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराचे मुद्दे मोठ्या शिताफीने पेरले होते. आणि नेमकी हीच गोष्ट मतदारांना भावली असल्याचं आता स्पष्ट होतं.
कानुगोलू यांनी मॅकिन्से या आंतरराष्ट्रीय कंपनीत कन्सल्टंट म्हणून काम केले आहे. सध्या कॉंग्रेसवासी असलेल्या कानुगोलू यांनी पूर्वी भाजपसाठी अनेक निवडणूक प्रचारांदरम्यान पोल स्ट्रॅटेजिस्ट म्हणून काम केलेलं आहे. २०१८ निवडणुकीदरम्यान त्यांनी कर्नाटकात भाजपची स्ट्रॅटजी आखण्याचं काम केलं होतं. त्या निवडणुकीत १०४ जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता. २०१४ साली नरेंद्र मोदी यांच्या प्रचार करणाऱ्या टीममध्ये कानुगोलू यांचा समावेश होता. तसेच उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये भाजपसाठी राजकीय प्रचार मोहिमांमध्ये त्यांनी स्टॅटेजिस्ट म्हणून सहभाग घेतला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तमिळनाडूत डीएमके नेते स्टॅलिन यांच्यासोबत तर२०२१ च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत AIADMK साठी त्यांनी पोल स्ट्रॅटेजिस्ट म्हणून काम केलं होतं.
कानुगोलू यांनी गेल्या वर्षी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सध्या ते राहुल गांधी यांच्या टीममध्ये काम करत आहेत. गेल्या वर्षी राहुल गांधी यांच्या कन्याकुमारी ते काश्मीरदरम्यानच्या 'भारत जोडो यात्रे'ची रणनीती आखणाऱ्या टीममध्ये कानुगोलू यांनी महत्वाची भूमिका वठवली होती.
संबंधित बातम्या