तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) गुरुवारी रात्री पाय घसरून जमिनीवर पडले. त्यानंतर त्यांना हैदराबाद येथील यशोदा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. केसीआर गुरुवारी रात्री एर्रावल्ली येथील आपल्या फार्महाउसमध्ये पडले होते. तेलंगणा विधानसभा निवडणुकीचे निकाल ३ डिसेंबर रोजी जाहीर झाले. यामध्ये केसीआर यांच्या बीआरएस पक्षाला मोठा झटका बसला व पक्ष सत्तेतून बाहेर फेकला गेला. काँग्रेसने पहिल्यांदाच तेलंगणात प्रचंड बहुमत मिळवून सरकार स्थापन केले आहे.
केसीआर यांची मुलगी कविता यांनी ट्वीट करत केसीआर यांच्या पडल्याची माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीट करत सांगितले की, बीआरएस सुप्रीमो केसीआर यांना किरकोळ दुखापत झाली आहे. सद्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळत असलेले समर्थन व शुभेच्छांमुळे ते लवकरच पूर्णपणे बरे होतील. सर्वांच्या प्रेमासाठी आभार.
रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार केसीआर यांच्यावर हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया पार पडणार आहे. ११९ जागांसाठी तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले होते व ३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर झाले. केसीआर मुख्यमंत्रीपदाची हॅट्रिक करण्यापासून वंचित राहिले. २०१३ मध्ये तेलंगाणा राज्याच्या स्थापनेपासून केसीआर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी होते. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसने ६४ तर बीआरएसने ३९ जागांवर विजय मिळवला. भाजपने ८ तर एमआयएमने ७ जागांवर विजय मिळवला.
काँग्रेस नेते रेवंत रेड्डी यांनी गुरुवारी तेलंगणाचे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या कार्यक्रमासाठी सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आदि उपस्थित होते. रेवंत तेलंगणा काँग्रेसचे अध्यक्षही आहेत. त्यांच्यासोबत १२ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
संबंधित बातम्या