BRS MLA Lasya Nanditha killed car accident : भारत राष्ट्र समितीच्या नवनियुक्त आमदार जी लस्या नंदिता (वय ३७) यांचा शुक्रवारी पहाटे कार अपघातात मृत्यू झाला. हा अपघात हैदराबादच्या सीमेवर तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील पाटनचेरू येथे आऊटर रिंग रोड (ओआरआर) वर पहाटे ६.३० च्या सुमारास झाला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी देखील त्यांच्या कारचा अपघात झाला होता. मात्र, या घटनेतून त्या सुदैवाने बचावल्या होत्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नंदिता या एका कार्यक्रमानिमित्त बाहेर गेल्या होत्या. हा कार्यक्रम आटोपून त्या त्यांच्या कारने परत येत होत्या. दरम्यान, हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर संगारेड्डी येथे त्यांच्या कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. यामुळे त्यांची कार ही दुभाजकाला जाऊन धडकली. या अपघात नंदिता यांना गंभीर मार लागल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत कार चालक गंभीर जखमी झाला असून त्याला पाटनचेरू येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्याची प्रकृती देखील चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
बीआरएसचे दिवंगत माजी आमदार जी सायन्ना यांची कन्या नंदिता या गेल्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सिकंदराबाद कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या. त्यांनी क्रांतिकारक बल्लादीर गद्दार यांच्या कन्या जी वेनेला यांचा पराभव केला होता.
या मतदारसंघातून पाच वेळा आमदार राहिलेल्या सायन्ना यांचे गेल्या वर्षी १९ फेब्रुवारीला आजारपणाने निधन झाले. त्या पक्षाच्या सक्रिय आणि मोठ्या नेत्या असल्याने बीआरएसने नंदिता यांना तिकीट दिले. दरम्यान, नंदिता या कवडीगुडा विभागातून ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेत नगरसेविका होत्या.
मरीगुडा जंक्शन येथे १३ फेब्रुवारी रोजी बीआरएसचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या सार्वजनिक रॅलीला त्या गेल्या होत्या. यावेळी परत येत असतांना देखील त्यांच्या कारचा अपघातात झाला होता. या अपघातात नंदिता किरकोळ जखमी होऊन थोडक्यात बचावल्या होत्या. हैदराबादला परतत असताना एका पांढऱ्या रंगाच्या कारच्या मद्यधुंद चालकाने त्यांच्या गाडीला धडक दिली होती. नंदिता यांनी ट्विट करून या अपघाताची माहिती दिली होती. “नालगोंडाहून परतताना अपघात झाला असून मी ठीक आहे, काळजी करण्यासारखे काहीही नाही. सर्वांच्या काळजी आणि समर्थनाबद्दल कृतज्ञता ”, असे ट्विट त्यांनी केले होते.