BAAP : बिहारमध्ये 'बाप' फॉर्मुला! काय आहे तेजस्वी यादव यांची नवी रणनीती?
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  BAAP : बिहारमध्ये 'बाप' फॉर्मुला! काय आहे तेजस्वी यादव यांची नवी रणनीती?

BAAP : बिहारमध्ये 'बाप' फॉर्मुला! काय आहे तेजस्वी यादव यांची नवी रणनीती?

Feb 21, 2024 01:26 PM IST

Tejashwi Yadav BAAP Formula : बिहारमध्ये भाजप आणि नितीश कुमार यांच्या युतीला टक्कर देण्यासाठी तेजस्वी यादव यांनी नवी रणनीती आखली आहे.

Tejashwi Yadav BAAP Formula
Tejashwi Yadav BAAP Formula

BAAP Formula in Bihar : नितीश कुमार यांनी अचानक कोलांटउडी मारून पुन्हा एकदा भाजपशी हातमिळवणी केल्यामुळं बिहारमधील महागठबंधन सरकार कोसळलं. त्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव पुन्हा मैदानात उतरले आहेत. भाजप आणि नितीश यांच्या युतीला धोबीपछाड देण्यासाठी त्यांनी 'बाप' फॉर्मुला तयार केला आहे. या फॉर्मुल्याची चर्चा सध्या संपूर्ण राज्यात आहे.

तेजस्वी यादव यांनी राज्यात जनविश्वास यात्रा सुरू केली आहे. त्यांच्या सभांना मोठी गर्दी होत आहे. या माध्यमातून ते कार्यकर्त्यांमध्ये जोश भरतानाच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांनाही साद घालत आहेत.

तेजस्वी यांनी पक्षाचा पाया आणखी विस्तारण्यासाठी 'बाप' फॉर्मुल्याचा आधार घेतला आहे. याआधीच्या MY समीकरणाला आणखी पुढं नेणारा हा फॉर्मुला आहे. याद्वारे जास्तीत जास्त लोकांना सोबत घेण्याचा तेजस्वी यादव यांचा प्रयत्न आहे. मुस्लिम आणि यादवांचा पक्ष हा शिक्काही त्यांना पुसायचा आहे.

तेजस्वी यांच्या BAAP फॉर्म्युल्यामध्ये ९० टक्के लोकांचा समावेश आहे. यात B म्हणजे बहुजन, AA म्हणजे आधी आबादी (अर्धी लोकसंख्या अर्थात महिला) आणि शेवटचा पी म्हणजे गरीब असा अर्थ आहे. RJD हा फक्त मुस्लिम आणि यादवांचा पक्ष आहे असे म्हणणाऱ्यांना हे उत्तर असल्याचं तेजस्वी यादव म्हणतात.

वास्तविक मुस्लिम आणि यादव समाजावर राष्ट्रीय जनता दलाचा मोठा पगडा आहे. राज्यात सुमारे ३१ टक्के लोकसंख्या आसलेल्या या समूहांचा राजदला मागील तीन दशकांपासून भक्कम पाठिंबा राहिला आहे. मात्र, आता भाजपनं या मतांमध्ये शिरकाव केला आहे. कोरी, कुर्मी, कुशवाहासह इतर ओबीसी जातींमध्ये भाजपनं बस्तान बसवलं आहे. त्यामुळं राष्ट्रीय जनता दलाला नव्यानं विचार करण्याची वेळ आली आहे.

स्वबळावर सत्तेसाठी प्रयत्न

राज्यात काँग्रेस कमकुवत आहे आणि जेडीयूची ताकदही पूर्वीसारखी नाही. अशा स्थितीत राजदला कोणत्याही परिस्थितीत भाजपच्या तुलनेत स्वतःला मजबूत करायचं आहे. तरच पक्षाला राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन करता येणार आहे. यामुळं राजद आता कमी लोकसंख्या असलेल्या मागासलेल्या जातींवरही लक्ष केंद्रित करत आहे. महिला मतदार नितीशकुमार यांच्या मोठ्या समर्थक मानल्या जातात. त्यांनाही राजदकडं वळवण्याचा तेजस्वी यादव यांचा प्रयत्न आहे.

तेजस्वी यादव यांच्या यात्रेचा उद्देश

तेजस्वी यादव यांची जनविश्वास यात्रा १० दिवस चालणार आहे. या माध्यमातून त्यांचं लक्ष प्रामुख्यानं तरुणांवर असेल. ते दररोज सुमारे ४ जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. तेजस्वी यादव हे यात्रेत शिक्षक भरतीचा आवर्जून उल्लेख करत आहेत. नितीश कुमार भाजपमध्ये गेल्यापासून श्रेयवादाचं राजकारण सुरू झालं आहे. आपल्यामुळं ही कामं झाल्याचं तेजस्वी यादव यांचा दावा आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर