Tarek Fateh passed away : पाकिस्तानमधील प्रसिद्ध पत्रकार व लेखक तारिक फतेह (Tarek Fateh) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अंतिम श्वास घेतला. तारिक फतेह यांची मुलगी नताशा फतेह हिने ट्विटरवरून त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. तारेक गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते व त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.
तारेक फतेह यांची मुलगी नताशा फतेह हिने तारिक यांचे अनेक फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. यासोबत ट्विट केले की, ‘पंजाबचा सिंह, भारताचा सुपुत्र, कॅनेडाचा प्रियकर, सत्य बोलणारा, न्यायासाठी लढणारा, शोषित-वंचितांचा आवाज असलेले तारिक फतेह यांनी आपली मोहीम पुढे नेली आहे. त्यांची क्रांती त्यांना ओळखणाऱ्या आणि प्रेम करणाऱ्या सर्वांसोबत जिवंत राहील.’
दोन दिवसापूर्वी तारेक यांच्या निधनाची अफवा पसरली होती. त्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली होती. तारेक फतेह काही वेळातच ट्विटरवर ट्रेंड करू लागले. मात्र, तारेक यांच्या जवळच्या लोकांनी त्या वृत्तांचे खंडन केले होते. मात्र आता त्यांच्या मुलीनेच तारेक यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
तारिक फतेह हे स्वत:ला हिंदुस्थानी म्हणवून घेत. ते पाकिस्तानलाही भारतीय संस्कृतीचाच एक भाग मानत. भारताची फाळणी चुकीची असल्याचं त्यांचं मत होतं. धर्मांधांच्या विरोधात असलेले तारिक फतेह हे भारतीय संस्कृतीचे प्रशंसक होते. ही संस्कृतीच भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांना एकत्र जोडू शकते असा त्यांचा विश्वास होता. कराचीमध्ये जन्मलेले तारिक फतेह १९८७ मध्ये कॅनडाला गेले आणि तिथंच स्थायिक झाले. रिपोर्टर म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणारे तारिक फतेह हे स्तंभलेखक राहिले. याशिवाय ते रेडिओ आणि टीव्हीवर समालोचनही करायचे. सोशल मीडियावरही त्यांचे चांगले फॉलोअर होते.
हिंदी, इंग्रजी, उर्दू, पंजाबी आणि अरबी अशा अनेक भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. मानवी हक्कांसाठी लढणारे कार्यकर्ते अशीही त्यांची एक ओळख होती. गेल्या काही वर्षांपासून ते भारतीय टीव्ही वाहिन्यांवरही दिसत होते. आपली मतं बेधडक मांडत होते. 'यहुदी माझे शत्रू नाहीत' असं पुस्तकही त्यांनी लिहिलं होतं. पाकिस्तानच्या क्रूरतेचे कडवे टीकाकार असलेले फतेह तिथल्या बलूच चळवळीचे समर्थक होते.
संबंधित बातम्या