chicken biryani eating competition : अनेक लोकांना नॉन व्हेजमध्ये बिर्याणी पसंत असते. जर बिर्याणी भरपेट खायची व वरती बक्षीसही जिंकायची संधी मिळाली तर.. मात्र दक्षिण भारतातील एका शहरातील लोकांना ही संधी मिळाली आहे. येथे चिकन बिर्याणी खाण्याची अनोखी स्पर्धा सुरू असून या हॉटेलने सर्वांचे लक्ष वेधले आहे. बिर्याणी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बुधवारी कोइम्बतूर बोचे फूड एक्सप्रेस रेल्वे हॉटेलमध्ये शेकडो लोकांनी गर्दी केली होती.
३० मिनिटांत ६ प्लेट बिर्याणी खाणाऱ्यांना एक लाख रुपये जिंकण्याची संधी मिळेल, अशी घोषणा या हॉटेलने केली होती. कोयंबटूर रेल्वे स्थानक परिसरात नुकतेच सुरू करण्यात आलेले बोचे फूड एक्सप्रेस ट्रेन हॉटेल खवय्यांमध्ये वेगाने लोकप्रिय होत आहे.
स्पर्धेचे वृत्त शहरात पसरताच कोइम्बतूर रेल्वे स्थानकावर लोकांची गर्दी जमली. यात स्पर्धेत अनेक स्त्री-पुरुष सहभागी झाले होते. हॉटेल मालकाच्या म्हणण्यानुसार, ही स्पर्धा खूप लोकप्रिय होत असून स्पर्धकांची संख्याही वाढत आहे. उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ही स्पर्धा गुरुवारी सकाळपर्यंत चालली. याबाबत हॉटेल मालकाने सांगितले की, आम्ही बिर्याणी स्पर्धेचे आयोजन केले होते, ज्यात सहा थाळी बिर्याणी खाणाऱ्या स्पर्धकांना एक लाख रुपये जिंकण्याची घोषणा करण्यात आली होती. चार थाळी खाणाऱ्यांना ५० हजार रुपये, तर तीन थाळी खाणाऱ्यांना एक हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ४०० जणांनी नोंदणी केली असून स्पर्धकांची संख्या वाढत आहे.
बिर्याणी खाण्याच्या स्पर्धेला मिळालेला चांगला प्रतिसाद लक्षात घेता भविष्यात अशा प्रकारच्या आणखी स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे हॉटेल मालकाने सांगितले. आम्ही कार्यक्रमासाठी बिर्याणीच्या १००० प्लेट तयार केल्या होत्या आणि आमचे स्वयंपाकघर २४ तास कार्यरत आहे. जेणेकरून आम्ही आमच्या गरजेनुसार अधिक बिर्याणी बनवू शकू. आम्ही दर महिन्याला एक नवीन स्पर्धा घेण्याचा विचार करीत आहोत ज्यात पुढील मसाला डोसा स्पर्धा असू शकते.