तामिळनाडूमध्ये एका गरोदर महिलेवर चालत्या ट्रेनमध्ये बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला चार महिन्यांची गरोदर होती. महिला डब्यात तिच्यावर अत्याचार करण्यात आला. महिलेने स्वत:ला वाचवण्यासाठी धडपड केली आणि मदतीसाठी आरडाओरडा केला तेव्हा आरोपीने तिला ट्रेनमधून ढकलले.
लोकांना ही महिला जखमी अवस्थेत दिसली आणि त्यांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. जोलारपेट्टई रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिरुपती इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये ६ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
दरम्यान कृष्णागिरी जिल्ह्यात आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली एका सरकारी शाळेतील तीन शिक्षकांना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीनंतर त्यांना निलंबित करण्यात आले आहे. ही घटना महिनाभरापूर्वीची असली तरी बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. पंचायत युनियन माध्यमिक शाळेत काम करणाऱ्या आरोपी शिक्षकांनाही अटक करण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळी पीडितेचा जबाब कॅमेऱ्यासमोर नोंदविण्यात आला. तिच्या जबाबाच्या आधारे आणि मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावली.
हरियाणातील नूह मध्ये एका मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. दोन आरोपी तरुणांचे गावकऱ्यांनी मुंडन करून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. स्थानिकांनी सांगितले की, नूंह जिल्ह्यातील एका गावातील रहिवासी इरफान आणि फरदीन अनेकदा जवळच्या गावातील मुलींचा छळ करत असत. पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार, बुधवारी सकाळी ती आपल्या घरी आईसोबत झोपली असताना दोघांनी तिच्यावर बलात्कार केला.
संबंधित बातम्या