Thalapathy Vijay : सिनेसृष्टीतून राजकारणात येणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेत्यांच्या यादीत आता आणखी एक भर पडली आहे. तमिळ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता थलपती विजय यानं राजकारण प्रवेशाची घोषणा केली आहे. एवढ्यावरच न थांबता विजय यानं नव्या राजकीय पक्षाचीही घोषणा केली आहे. विजयच्या या घोषणेनंतर त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
सोशल मीडियात पोस्ट करून विजयनं स्वत: ही माहिती दिली आहे. तमिळगा वेत्री कळगम असं थलपती विजयच्या नव्या पक्षाचं नाव असेल. पक्षाच्या नावाची घोषणा करतानाच त्यानं पुढील वाटचालीचा रोडमॅपही सांगितला आहे. '२०२४ ची लोकसभा निवडणूक आम्ही लढवणार नाही. तसंच, आम्ही कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही, असं त्यानं स्पष्ट केलं आहे. सर्वसाधारण आणि कार्यकारी परिषदेच्या बैठकीसाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे.
‘२०२६ ची विधानसभा निवडणूक हे आमचं लक्ष्य आहे. निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाल्यानंतर आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर आम्ही चिन्ह, झेंडा, विचारसरणी, धोरणे, लोकांशी भेटीगाठी आणि दौऱ्यांबाबत निर्णय घेऊ. सध्या आमच्या पक्षानं नोंदणीसाठी अर्ज केला आहे. राजकारण हा माझा छंद नाही. तर, पॅशन आहे. मी स्वतःला राजकारणासाठी पूर्णपणे समर्पित करणार आहे, असं विजयनं स्पष्ट केलं आहे.
'थेरी', 'मास्टर', 'बिगिल', 'बीस्ट', 'पुली', 'थुप्पक्की', 'मर्सल' आणि 'कथ्थी' अशा मसालेदार व गाजलेल्या चित्रपटांसाठी ओळखला जाणारा थलापती विजय अलीकडं 'लिओ' या सिनेमात दिसला होता. या चित्रपटात संजय दत्तची देखील भूमिका होती.
'पक्षाच्या कामात व्यत्यय न आणता चित्रपटाशी संबंधित माझ्या उर्वरीत जबाबदाऱ्या मी लवकरच पूर्ण करणार आहे. त्यानंतर जनतेच्या सेवेसाठी पूर्णपणे राजकारणात सक्रिय होण्याचा शब्द मी आधीच दिला आहे. तामिळनाडूच्या जनतेचं माझ्यावर ऋण आहे, असं मी मानतो, असंही त्यानं म्हटलं आहे.
'गेल्या अनेक वर्षांपासून मी अनेक लोककल्याणकारी कामं करत आहे. पण अनेक राजकीय बदल केवळ सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून करता येत नाहीत, त्यासाठी राजकीय सत्तेची गरज असते. सध्याची राजकीय परिस्थिती तुम्हा सर्वांना माहीत आहे. चुकीचं प्रशासन आणि भ्रष्ट राजकारण एकीकडं आपल्या जनतेत फूट पाडण्यासाठी भेदाभेदाचं आणि फॅसिस्ट राजकारण करत आहे. जनतेच्या विकासात आणि ऐक्यात सर्व बाजूंनी अडथळे आणले जात आहेत, असं त्यानं म्हटलं आहे.
यापूर्वी एमजी रामचंद्रन, शिवाजी गणेशन, जयललिता, कमल हासन यांसारख्या दिग्गजांनी तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश केला आहे. तामिळ सुपरस्टार रजनीकांत यांनीही पक्षाची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी माघार घेत सिनेमातच रमणं पसंत केलं आहे. दक्षिणेत कलाकारांनी यशस्वी राजकारण केल्याची अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळं थलपती विजय राजकारणात यशस्वी होणार का याविषयी उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या