Mumbai Bomb Blast case : १९९३ साली देशात ठिकठिकाणी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अब्दुल करीम टुंडा (Abdul Karim Tunda) याची निर्दोष सुटका झाली आहे. राजस्थानमधील अजमेरच्या टाडा कोर्टानं (Ajmer Tada Court) हा निर्णय दिला आहे.
बॉम्बस्फोटानंतर तब्बल ३१ वर्षांनंतर हा निर्णय आला आहे. टुंडाची सुटका करतानाच न्यायालयानं इरफान आणि हमीदुद्दीन यांना दोषी ठरवलं आहे. त्या दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
बाबरी मशीद पतनानंतर १९९३ मध्ये मुंबई, कानपूर, हैदराबाद, सुरत आणि लखनऊमध्ये काही रेल्वे गाड्यांमध्ये एकापाठोपाठ एक स्फोट झाले होते. या प्रकरणी अब्दुल करीम टुंडा, इरफान आणि हमीमुद्दीन यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. अब्दुल करीम टुंडा याला २०१३ मध्ये नेपाळ सीमेवरून पकडण्यात आले होते. सर्व आरोपींविरुद्ध टाडा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात आतापर्यंत दीडशेहून अधिक जणांची साक्ष झाली आहे.
अब्दुल करीम टुंडा हा उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्याचा रहिवासी आहे. तो पिलखुवा इथं सुतारकाम करायचा. अब्दुल करीम टुंडा लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा संशय आहे. टुंडानं पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयकडून दहशतवादी कारवायांचं प्रशिक्षण घेतल्याचं सांगितलं जातं. मशिदीतील एका कार्यक्रमाच्या वेळी पाइप गननं चालवल्यामुळं अब्दुल करीमला एक हात गमवावा होता. तेव्हापासून त्याचं नाव टुंडा पडलं होतं . टुंडाला १९९३ च्या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी बनवण्यात आले होते.
बाबरी मशीद विध्वंसाला वर्ष झाल्याच्या दिवशी, ६ डिसेंबर १९९३ रोजी दहशतवाद्यांनी ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणले. या प्रकरणी एकूण १७ आरोपींना अटक करण्यात आली होती. या स्फोटातील पीडित वर्षानुवर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत होते. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर टाडा न्यायालयानं २३ फेब्रुवारी रोजी निर्णय राखून ठेवला होता. आज टाडा कोर्टानं या प्रकरणी अंतिम निकाल दिला आहे.