Cricketer Radha Yadav Caught in Flood : गुजरातमध्ये रविवारपासून होत असलेल्या पावसामुळे अनेक जिल्ह्यात पुर आला आहे. या पुरामुळे ३० पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर पायाभूत सुविधांचं देखील मोठ नुकसान झालं आहे. या पुराचा फटका भारतीय महिला क्रिकेटपटू राधा यादवला देखील बसला. वडोदरा येथे आलेल्या पुरामुळे तिच्या घराभोवती पाणी साचले. या पुरात काहीही न खाता पिता ती ४८ तास अडकून पडली होती. तिच्या घरात पुराचे पाणी गेल्याने मोठे नुकसान देखील झाले आहे. या घटनेची माहिती अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यांनी तातडीने बचाव कार्य राबवत बुधवारी संध्याकाळी राधा यादवला तिच्या अरण्य अपार्टमेंट्स येथील निवासस्थानातून सुखरूप बाहेर काढले.
गुजरातमध्ये आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक नागरिक पुरात अडकून पडले असून त्यांना वाचवण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. वडोदरा शहराला देखील पुराचा फटका बसला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू राधा यादव हिच्या घराला देखील पुराणे वेढा दिला होता. तब्बल दोन दिवस ती या पुरात अडकून पडली होती. याची माहिती अग्निशामक दलाला मिळाल्यावर तिला सुखरूप वाचवण्यात आले.
या बाबत राधाने एका वृत्तपत्राशी बोलताना तिचा अनुभव कथन केला आहे. राधा म्हणाली, माझ्यासाठी हा एक भयानक अनुभव होता. माझ्या घराभोवती पहिल्यांदा पाणी वेढलेले मी पाहिले. अग्निशामक दलाने तातडीने पावले उचलत मला आणि माझ्या कुटुंबीयांना सुखरूप बचावले यामुळे मी त्यांची ऋणी आहे.
राधा म्हणाली, २५ ऑगस्ट रोजी मी मुंबईहून वडोदरात आली होती. तेव्हापासून जोरदार पाऊस सुरू झाला. हळू हळू घरभोंवती पाणी साठण्यास सुरुवात झाली. मला वाटले की हे पाणी तात्पुरते राहील व पुन्हा परिस्थिती सामान्य होईल. मात्र, काही तासांनी आमच्या अपार्टमेंटच्या आजूबाजूला पाणी वाढतच गेले व आम्ही या पुरात अडकलो. आमच्याकडे पुरेसे खाद्य पदार्थ देखील नव्हते. व्हीएमसी आणि अग्निशमन दलाने बोटी आणि खाद्यपदार्थ आणले.
गुजरातमधील अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपले. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात गुरुवारी समुद्रकिनारी असलेल्या मांडवी शहरात ३१५ मिमी पावसाची नोंद झाली. जामनगर आणि राजकोटमध्ये पावसाने विश्रांती घेतली असताना, मंदिराचे शहर द्वारका येथे १४४ मिमी पावसाची नोंद झाली. या ठिकाणी शहरात काही भागात पुर आला आहे. अनेक भागत पाणी सचल्याने नागरिक अडकून पडले आहेत. सरकारी आकडेवारीनुसार राज्यात २५ ते २९ ऑगस्ट या कालावधीत ३२ नागरिकांचा पुरामुळे मृत्यू झाला. बुधवारपासून पाणी कमी होण्यास सुरुवात झाल्यानंतर वडोदरा येथे वेगवेगळ्या भागात सात मृतदेह आढळून आल्याने मृतांची संख्या ३९ वर पोहोचली आहे. यामध्ये बुधवारी सापडलेल्या दोन आणि गुरुवारी सापडलेल्या पाच मृतदेहांचा समावेश आहे.
गुजरातमध्ये आलेल्या पुरामुळे ३२९३३ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. राजकोट आंतरराष्ट्रीय विमानतळ, हिरासर येथील तात्पुरत्या टर्मिनलवर देखील पाणी साचले होते. मंगळवारी धावपट्टीच्या सीमेवरील भिंत मुसळधार पावसामुळे कोसळली.