हिजबुल्लाहविरोधात युद्धाचे बिगुल फुंकणाऱ्या इस्रायली सैन्याने दहशतवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या लेबनॉनमध्ये प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे इस्रायलच्या भूमीवरही दहशतवादी हल्ला झाला आहे. तेल अवीवजवळील जाफावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. ज्यात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, दोन हल्लेखोर होते आणि त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा होता. सुरक्षा दलांनी दोन्ही हल्लेखोरांचा खात्मा केला आहे.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, इस्रायल पोलिसांनी मंगळवारी सांगितले की, तेल अवीवजवळील जाफाच्या सीमेवर संशयित दहशतवाद्यांनी गोळीबार केला. इस्रायलच्या वेळेनुसार सायंकाळी सात वाजता हा हल्ला झाला. या हल्ल्यात ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती इस्रायलच्या प्रसारमाध्यमांनी दिली आहे.
दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळताच मोठ्या संख्येने सुरक्षा दल घटनास्थळी दाखल झाले आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, दोन दहशतवाद्यांनी नागरिकांवर गोळीबार केला. पोलिसांनी दोन्ही हल्लेखोरांना कंठस्नान घातले आहे. दोघेही मोठ्या प्रमाणात शस्त्रधारी होते. जेरुसलेम बुलेव्हार्डवर दोन दहशतवादी ट्रेनमधून उतरले आणि पिस्तूल किंवा रायफल काढून लोकांवर गोळीबार सुरू केला. त्यानंतर सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर देत एकाचा जागीच खात्मा केला.
दरम्यान, इस्रायली सैन्याने लेबनॉनमध्ये घुसून मोठ्या प्रमाणावर ग्राउंड ऑपरेशन मोहीम हाती घेतली आहे. इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात अलीकडच्या काही महिन्यांत सीमेपलीकडून झालेल्या हल्ल्यांनंतर तणाव वाढत असताना हे आक्रमण करण्यात आले आहे. इस्रायलच्या लष्कराने आज एक निवेदन जारी करून सांगितले की, दक्षिण लेबनॉनमधील गावांवर लक्ष्य करून हल्ले करण्यात आले. इस्रायलच्या सीमेजवळील गावांमध्ये असलेल्या हिजबुल्लाहवर हल्ला करून इस्रायली सैन्याने लेबनॉनमध्ये हवाई हल्ले आणि तोफगोळ्यांचा मारा सुरू केला, असे निवेदनात म्हटले आहे.
इस्रायली लष्कराच्या निवेदनानुसार, इस्रायल लेबनॉनच्या सीमेवर असलेल्या हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांचा तळावर हल्ले केले जात आहेत. यामुळे उत्तर इस्रायलमध्ये राहणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. इस्रायलच्या अध्यक्षांच्या सुचनानंतर हे हल्ले करण्यास सुरुवात झाली आहे. हा लष्करी हल्ला हिजबुल्लाहविरुद्धच्या युद्धाचा पुढचा टप्पा असल्याचे मानले जात आहे.