Passengers Drink 15 Litres Alcohol in Surat to Bangkok Flight : एअर इंडिया एक्स्प्रेसने शुक्रवारी गुजरातमधील सुरत ते बँकॉकपर्यंतचे पहिली थेट विमानसेवा सुरू केली. या विमानसेवेला प्रवाशांनी मोठा प्रतिसाद दिला. ही फ्लाईट फुल्ल झाली होती. या विमान प्रवासात प्रवाशांनी विमानसेवेचा मनसोक्त आनंद लुटला. सूरत आणि बँकॉक या ४ तासांच्या प्रवासात प्रवाशांनी तब्बल १.८ लाख रुपयांची १५ लिटर दारू रिचवली. या सोबतच खास गुजराती पदार्थ खमण, ठेपला आणि चिवडा हे देखील चकणा म्हणून फस्त केले. या प्रवाशांना सर्व्ह करून मात्र, एयरहोस्टेसची पुरती दमछाक झाली. या प्रवासाचा अनुभव व व्हिडिओ काही प्रवाशांनी शेअर केला असून याचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे.
या विमान प्रवासात प्रवाशांची चांगलीच चंगळ झाली. गुजराती प्रवाशांनी सर्वाधिक मद्य सेवन केले त्यात अनेक ब्रॅंडेड दारू होती. यात चिवास रिगल, बकार्डी आणि बिअर यांचा समावेश होता. तब्बल १.८ लाख रुपयांची दारू प्रवाशांनी रिचवली. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी दारू प्यायल्याने विमानातील कर्मचारीही हैराण झाले.
बँकॉकला पोहोचण्यापूर्वी प्रवाशांनी आणखी दारूची मागणी केली. मात्र, क्रू मेंबरला अखेर दारू संपली असल्याचे जाहीर करावे लागले. हा प्रवास अनोखा होता. प्रवाशांनी दारूच्या सोबतीला चकणा म्हणून पिझ्झासारखे इतर पदार्थ नाही तर खास गुजराती पदार्थ असलेला थेपला, खमण आणि चिवडा यावर ताव मारला. गुजराती प्रवाशांनी सोबत आणलेले पदार्थ देखील संपवले. विमान टेक ऑफ होताच नागरिकांनी दारू, बियर आणि वाईन ऑर्डर करायला सुरुवात केली. हे विमानात ३०० प्रवाशांसह ४ तासांत बँकॉकला पोहोचणार होते. मात्र, विमान बँकॉकला उतरण्यापूर्वीच सर्व दारू संपली.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. अनेक नेटकऱ्यांनी गुजरातमध्ये असलेल्या दारूबंदीवर देखील टीका केली. एका सोशल मीडिया वापरकर्त्याने हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं की, 'यावरून हे सिद्ध झालं आहे की गुजरातचे रहिवासी दारूचे सेवन करू शकतात. त्यामुळे आता गुजरात सरकारने दारू बंदीच्या नियमावर पुन्हा विचार करण्याची गरज आहे. ही बंदी हटवून संभाव्य महसूल देखील राज्याला मिळणार असून यामुळे राज्याचा खऱ्या अर्थाने विकास होणार आहे.
तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले की, 'सुरत ते बँकॉक ही पहिली थेट फ्लाइट खूप चांगली होती! उद्घाटनाच्या प्रवासात ९८ टक्के प्रवाशांसह, एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइटने मोठ्या थाटात उड्डाण केले. प्रवाशांनी त्यांचे आवडते स्नॅक्स जसे की थेपला, खमण आणि पिझ्झा सोबत आणले, ज्यामुळे प्रवासात खरा खुरा सुरती उत्सव बनला. सर्व स्नॅक्स आणि दारूची पूर्ण विक्री झाल्याने इन-फ्लाइट सेवा देखील सुपर हिट ठरली आहे!'
गुजरातमध्ये मद्य सेवन आणि विक्रीवर बंदी आहे. १९६० पासून या राज्यात राज्यात दारू बंदी कायदा आहे, परंतु असे असले तरी छुप्या मार्गाने या ठिकाणी दारू मिळते. गुजरात सरकारने अलीकडेच गांधीनगरमध्ये बांधल्या जाणाऱ्या भारतातील पहिल्या वित्तीय सेवा केंद्रात, गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी (GIFT) मध्ये दारू पिण्यास परवानगी दिली आहे.
संबंधित बातम्या