मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  SC on Manipur : मणिपुरात महिलांना निर्वस्त्र फिरवलं! सुप्रीम कोर्टाचा सरकारला निर्वाणीचा इशारा; कारवाई करा, नाहीतर…

SC on Manipur : मणिपुरात महिलांना निर्वस्त्र फिरवलं! सुप्रीम कोर्टाचा सरकारला निर्वाणीचा इशारा; कारवाई करा, नाहीतर…

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jul 20, 2023 01:14 PM IST

Supreme Court on Manipur Incident : मणिपूरमध्ये दोन समुदायांमध्ये सुरू असेलल्या संघर्षादरम्यान दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. सर्वोच्च न्यायालयानं या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.

Supreme Court of India
Supreme Court of India (HT_PRINT)

Supreme Court on Manipur Incident : आरक्षणाच्या मुद्द्यावरून मागील तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारानं कळस गाठला आहे. नराधम समाजकंटकांनी काल दोन महिलांची नग्न धिंड काढली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळं देश हादरला असून सर्वोच्च न्यायालयानं याची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला थेट इशाराच दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सर्वोच्च न्यायालयानं या घटनेची स्वत:हून दखल घेतली आहे.सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. मणिपूरमध्ये घटलेली घटना हे मोठं घटनात्मक अपयश आहे. राज्य सरकारनं यावर तातडीनं कारवाई करावी. नेमकी काय कारवाई केली आणि महिलांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकार काय उपाययोजना करतंय याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत.

मणिपूरमधील व्हिडिओ हादरवून टाकणारा आहे. या घटनेमुळं आम्ही दु:खी व चिंतीत आहोत. हे अजिबात स्वीकारार्ह नाही. सरकारनं तातडीनं पावलं उचलून कारवाई करायला हवी. सरकारनं काही केलं नाही तर आम्ही स्वत: या संदर्भात कारवाई करू, असा इशाराच सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी २८ जुलै रोजी घेतली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

'हिंसाचारात महिलांचा वापर होणं हे धक्कादायक आहे. जे काही झालं ते घटनात्मक आणि मानवी अधिकारांचं सर्रास उल्लंघन आहे. या प्रकरणात सरकार काय करतंय त्याची माहिती न्यायालयाला मिळाली पाहिजे, जेणेकरून अशा हिंसाचारात सामील असलेल्या गुन्हेगारांना शिक्षा करता येईल, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.

मणिपूरमध्ये नेमकं काय घडलं?

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही लोकांचा जमाव दोन महिलांची नग्न धिंड काढत असल्याचं आणि त्यांचा विनयभंग करत असल्याचं दिसत आहे. त्यानंतर या महिलांना शेतात नेऊन त्यांच्यावर बलात्कार झाल्याची माहिती समोर आली आहे. मणिपूरची राजधानी इम्फाळपासून ३५ किमी अंतरावर असलेल्या कांगपोकपी जिल्ह्यात ४ मे रोजी ही घटना घडली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मणिपूर पोलिसांनी या घटनेतील मुख्य आरोपी हेरादास (वय ३२) याला थौबल जिल्ह्यातून अटक केली आहे. हेरादास या व्हिडिओत हिरव्या टी-शर्टमध्ये दिसला होता.

WhatsApp channel