मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणात हिंदू पक्षाला सुप्रीम कोर्टाने झटका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद हायकोर्टाच्या त्या निर्णयाला स्थगिती दिली आहे,ज्यामध्येशाही ईदगाह मशिदीचे सर्वेक्षण करण्यासाठी आयुक्त नियुक्त करण्याचे आदेश दिले होते.
अलाहाबाद हायकोर्टाने गेल्या वर्षी १४ डिसेंबर रोजी मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिराच्या शेजारील शाही ईदगाह परिसराच्या सर्वेक्षणास मंजुरी दिली होती. या निर्णयाविरोधात मुस्लिम पक्षकरांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.
सुप्रीम कोर्टाने मुस्लिम पक्षाच्या याचिकेवर सुनावणी करताना म्हटले की, या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी सुरू राहील, मात्र सर्वे करण्यासाठी कोर्ट कमिश्नर नियुक्तीवर अंतरिम स्थगिती असेल.
सुप्रीम कोर्टाने हिंदू पक्षावर प्रश्न उपस्थित करताना म्हटले की, तुमचा अर्ज स्पष्ट नाही. तुम्हाला स्पष्टपणे सांगावे लागेल की, तुम्हाला काय हवे. त्याचबरोबर ट्रान्सफरचे प्रकरणही न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावरही निर्णय होणे बाकी आहे.
श्रीकृष्णाच्या जन्मठिकाणी ही मशीद बांधण्यात आली असून, येथे सर्व्हे केला जावा अशी हिंदू संघटनांची मागणी होती. यासंबंधी त्यांनी सर्व्हेची मागणी करत कोर्टात धाव घेतली होती. अलाहाबाद हायकोर्टाने शाही ईदगाह परिसराचा सर्व्हे करण्यासाठी मंजुरी दिली होती, मात्र याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
शाही ईदगाह परिसराच्या सर्वेक्षणाच्या मागणीसाठी श्रीकृष्ण विराजमान आणि अन्य सात लोकांनी वकील हरि शंकर जैन, विष्णु शंकर जैन, प्रभाष पांडे आणि देवकी नंदन यांच्या माध्यमातून अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल करून ASI सर्वेची मागणी केली होती. याचिकेत दावा केला होता की, भगवान श्री कृष्णाचे जन्मस्थळ मशिदीच्या खाली आहे. तेथे अनेक संकेत आहेत जे स्पष्ट करतात की मशिद एक हिंदू मंदिर होते.