Supreme court : अंमली पदार्थांची तस्करी गंभीर आणि गुंतागुंतीची असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी एका आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायालयाने या प्रकरणाचे गांभीर्य स्पष्ट करण्यासाठी लोकप्रिय वेब सीरिज 'नार्कोस' आणि 'ब्रेकिंग बॅड'चा हवाला दिला. अशा प्रकारच्या ड्रग्ज सिंडिकेटमुळे देशातील तरुणांचे मोठे नुकसान होत असून त्यांच्या भवितव्याला धोका निर्माण होत आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सब्सटेन्सेस (एनडीपीएस) कायद्यान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी ड्रग्ज सिंडिकेटचा महत्त्वाचा सदस्य असल्याचे समजते. आपण समाजासाठी मोठा धोका नसून आपली अटक अनावश्यक असल्याचा दावा करत त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावत जामीन देण्यास नकार दिला. या प्रकरणाचे गांभीर्य स्पष्ट करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, अमली पदार्थांच्या तस्करीचे जाळे खूप मोठे आणि धोकादायक आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांनी एनडीपीएस प्रकरणात जामीन अर्ज फेटाळताना म्हटले की, तुम्ही नार्कोस पाहिले का? अतिशय मजबूत सिंडिकेट आहे. ते क्वचितच पकडले जातात. मी तुम्हाला आणखी एक वेबसीरिज सांगतो, ब्रेकिंग बॅड. ते नक्की पाहा. तुम्ही या लोकांशी लढू शकत नाही. ते या देशातील तरुणांना अक्षरशः मारत आहेत.
अमली पदार्थांची तस्करी ही केवळ एका व्यक्तीची बाब नसून, त्याचा परिणाम समाजातील प्रत्येक घटकावर, विशेषत: तरुणांवर होतो, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने या प्रकरणात कोणतीही शिथिलता देण्यास नकार देत अंमली पदार्थांविरोधातील लढाईत कायद्याचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे, असा संदेश दिला.
'ब्रेकिंग बॅड' ही एक अमेरिकन वेब सीरिज आहे, जी वॉल्टर व्हाईटची गोष्ट सांगते. वॉल्टर न्यू मेक्सिकोमधील हायस्कूल रसायनशास्त्राचे शिक्षक असून त्यांना कर्करोग होतो. आपल्या कुटुंबाचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी तो मेथाम्फेटामाइन (औषध) तयार करून विकण्याचे धोकादायक काम सुरू करतो. वॉल्टर ने आपला माजी विद्यार्थी जेसी पिंकमन सोबत मिळून एक मोठी ड्रग्ज सिंडिकेट तयार केली. तो हळूहळू आपल्या निरागस ओळखीतून बाहेर पडतो आणि "हायझेनबर्ग" नावाचा क्रूर आणि धूर्त ड्रग्ज लॉर्ड बनतो. लोभ, गुन्हेगारी आणि नैतिक अधःपतन माणसाला कसे बदलू शकते हे या मालिकेतून दाखवण्यात आले आहे. ड्रग्ज माफियांचा हिंसाचार, बिघडलेले कौटुंबिक नातेसंबंध आणि गुन्हेगारीच्या जगाचे धोके या कथेत अधोरेखित करण्यात आले आहेत.
'नार्कोस' ही वेबसीरिज कोलंबियाचा कुख्यात ड्रग्ज माफिया पाब्लो एस्कोबार आणि त्याच्या मेडेलिन कार्टेलच्या सत्य कथेवर आधारित आहे. पाब्लो एका गरीब शेतकऱ्याकडून जगातील सर्वात मोठा ड्रग्ज माफिया कसा बनतो हे या मालिकेत दाखवण्यात आले आहे. पाब्लोचा कार्टेल कोकेनचा व्यापार करतो आणि त्याचे जाळे जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहे. तो आपले साम्राज्य वाचविण्यासाठी कोणत्याही थराला जातो, ज्यात हिंसा, भ्रष्टाचार आणि हत्येचा समावेश आहे.
पाब्लोला रोखण्यासाठी यूएस डीईए (ड्रग एन्फोर्समेंट एजन्सी) आणि कोलंबिया सरकारचे प्रयत्नही या मालिकेत दाखवण्यात आले आहेत. 'नार्कोस'मध्ये अमली पदार्थांच्या तस्करीची क्रूरता तर दाखवण्यात आली आहेच, पण गुन्हेगारी, सत्ता आणि संपत्ती समाजाचे कसे नुकसान करू शकते, हेही दाखवण्यात आले आहे.
संबंधित बातम्या