Uddhav Thackeray : क्रांतीची मशाल उद्धव ठाकरेंचीच, सुप्रीम कोर्टानं समता पक्षाची याचिका फेटाळली
Supreme Court Live : सुप्रीम कोर्टाच्या पुढच्या आदेशापर्यंत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मशाल हे चिन्ह वापरता येणार आहे.
Supreme Court Reject Samata Party Petition : एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील ४० आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेनेतील फूटीचं प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहचलं आहे. याशिवाय निवडणूक आयोगानं शिवसेनेचं नाव आणि चिन्ह शिंदे गटाला बहाल केलं. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाला 'शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव आणि मशाल चिन्ह दिलं आहे. परंतु आता मशाल चिन्हावर आक्षेप घेत बिहारमधील समता पार्टीनं निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. परंतु आज सुप्रीम कोर्टानं समता पार्टीची याचिका फेटाळून लावत उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळं आता सुप्रीम कोर्टाच्या पुढील आदेशापर्यंत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मशाल हे चिन्ह वापरता येणार आहे.
ट्रेंडिंग न्यूज
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर मुंबईच्या अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेला मशाल हे चिन्ह तात्पुरत्या स्वरुपात देण्यात आलं होतं. त्याची मुदत आज म्हणजेच २७ मार्चला संपणार होती. त्यापूर्वीच समता पार्टीनं मशाल या चिन्हावर दावा करत सुप्रीम कोर्टात धाव घेतली. परंतु सुप्रीम कोर्टानं पुढील आदेशापर्यंत मशाल हे चिन्ह उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळं आता मोठ्या राजकीय संकटात सापडलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा दिलासा मिळाला आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेला नवं नाव आणि चिन्ह मिळणार?
शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगानं शिवसेनेचं नाव आणि चिन्ह गोठवत शिंदे आणि ठाकरे गटाला वेगवेगळं नाव आणि चिन्ह दिलं होतं. त्यानंतर शिंदे गटाला शिवसेना मिळाल्यानंतर ठाकरे गटाचं नाव आणि चिन्ह अद्याप बदलण्यात आलेलं नाही. त्यामुळं आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला निवडणूक आयोगाकडून नवं नाव आणि चिन्ह दिलं जाणार आहे.