CJI DY Chandrachud : देशात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहेत. सायबर चोरटे रोज नव्या नव्या कलुत्या वापरुन लोकांची फसवणूक करून त्यांना लुबाडत आहेत. या साठी आता एआयचा वापर करून मोठ्या व्यक्तिच्या नावाचा वापर केला जात आहे. तर काही जणांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक करून लोकांकडे पैसे मागितले जातात. तर, काही वेळा थेट बँक खाते हॅक करून फसवणूक केली जाते. आता या सायबर चोरट्यांनी कळस गाठला असून भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नावाचा वापर करून या चोरट्यांनी नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचं उघड झालं आहे.
सध्या सायबर गुन्हेगार पैसे उकळण्यासाठी नवनवीन पद्धती अवलंबत आहेत. भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या नावाने पैशांची मागणी केल्याची एक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत आरोपीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांचा फोटो पोस्ट करून एका व्यक्तीकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नावाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वरून पैशांची मागणी करणारी पोस्ट व्हायरल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने कारवाई केली आहे.
पीटीआय-भाषेच्या अहवालानुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकाऱ्यांनी या पोस्टची दखल घेतली. यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकाऱ्यांनी दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलमध्ये या प्रकरणी तक्रार दाखल केली. यानंतर दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलमध्ये सोशल मीडिया हँडलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यायमूर्ती चंद्रचूड असे भासवणाऱ्या एका भामट्याने ही पोस्ट केल्याचे सांगण्यात येत आहे. सार्वजनिक केलेल्या पोस्टच्या स्क्रीनशॉटनुसार, सायबरचोरट्याने लिहिले की, हॅलो, मी सरन्यायाधीश आहे. कॉलेजियमबरोबर आमची एक महत्त्वाची बैठक आहे. मी कनॉट प्लेसमध्ये अडकलोय. मला कॅबसाठी (टॅक्सी) ५०० रुपये पाठवू शकता का? मी न्यायालयात पोहोचताच तुमचे पैसे परत करेन”. मेसेजच्या शेवटी हेदेखील सांगण्यात आलं होतं की हा मेसेज कोणत्या डिव्हाईसवरून पाठवला होता. ‘सेंट फ्रॉम आयपॅड’ आयपॅडवरून पाठवलेला संदेश) असा दुसरा मेसेज स्कॅमरने पाठवला होता.
एका दिवसापूर्वी, बनावट ई-नोटिस आणि बनावट ई-मेल्सशी संबंधित फसवणुकीची प्रकरणे पाहता, सरकारने लोकांना अशा बनावट मेल आणि ई-नोटिसपासून सावध राहण्याचा इशारा दिला होता. यावर उत्तर देण्याऐवजी सरकारने लोकांना सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटरच्या वेबसाइटवर तत्काळ तक्रार करण्यास सांगितले आहे. अहवालानुसार, सायबर चोरटे असे बनावट मेल पाठवून गृह मंत्रालयाच्या विविध तपास यंत्रणांशी संबंधित लोकांची फसवणूक करत आहेत.