मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Rajya Sanba : सुधा मूर्ती राज्यसभेत पहिल्यांदाच बोलल्या! भाषणात उपस्थित केले अत्यंत महत्त्वाचे विषय

Rajya Sanba : सुधा मूर्ती राज्यसभेत पहिल्यांदाच बोलल्या! भाषणात उपस्थित केले अत्यंत महत्त्वाचे विषय

Jul 03, 2024 11:00 AM IST

sudha murty first speech in rajya sabha : राज्यसभेतील आपल्या पहिल्याच भाषणात सामाजिक कार्यकर्त्या सुधा मूर्ती यांनी अत्यंत महत्त्वाचे विषय मांडले.

सुधा मूर्ती राज्यसभेत पहिल्यांदाच बोलल्या! भाषणात उपस्थित केले अत्यंत महत्त्वाचे विषय
सुधा मूर्ती राज्यसभेत पहिल्यांदाच बोलल्या! भाषणात उपस्थित केले अत्यंत महत्त्वाचे विषय

sudha murty first speech in rajya sabha : राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेचं सदस्यत्व मिळालेल्या सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका सुधा मूर्ती यांनी आज राज्यसभेत पहिलं भाषण केलं. पहिल्याच भाषणात त्यांनी देशातील अर्ध्या लोकसंख्येशी संबंधित असलेल्या महत्त्वाच्या विषयावर मांडणी केली. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला आळा घालण्यासाठी सरकारनं लसीकरण कार्यक्रम सुरू करावा, अशी जोरदार मागणी त्यांनी केली.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर नियुक्ती केली होती. त्याचा उल्लेख मूर्ती यांनी भाषणाच्या सुरुवातीला केला. त्यानंतर त्यांनी गर्भाशयाच्या कॅन्सरचा मुद्दा मांडला. '९ ते १४ वयोगटातील मुलींना दिली जाणारी लस गर्भाशयग्रीवाची लस म्हणून ओळखली जाते. मुलींनी ती लस घेतल्यास हा कॅन्सर टाळता येतो. आपल्या मुलींच्या फायद्यासाठी या लसीकरणाला प्रोत्साहन दिलं पाहिजे. उपचारापेक्षा प्रतिबंध कधीही चांगला असतो, असं त्या म्हणाल्या.

ट्रेंडिंग न्यूज

लसीच्या किंमती कमी व्हाव्यात!

पाश्चिमात्य देशांमध्ये गर्भाशयग्रीवाची लस बनवण्यात आली आहे. गेल्या २० वर्षांपासून त्याचा वापर केला जात आहे. तिचा परिणामही चांगला आहे. ही लस फार महाग नाही. भारतात या लसीची किंमत १४०० रुपये आहे. सरकारनं हस्तक्षेप करून वाटाघाटी केल्यास ही किंमत ७०० ते ८०० रुपयांपर्यंत खाली आणता येईल. आपली लोकसंख्या मोठी आहे. त्यामुळं भविष्यात आपल्या मुलींना याचा फायदा होईल, असं त्या म्हणाल्या.

पर्यटनाला चालना देण्याची गरज

महिलांच्या आरोग्याबरोबरच देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्याची गरजही मूर्ती यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली. भारतात ४२ जागतिक वारसा स्थळे आहेत, पण आणखी ५७ ठिकाणं अशी आहेत, जी जागतिक वारसा स्थळं होऊ शकतात. आपण त्याची काळजी घेतली पाहिजे, असं त्या म्हणाल्या.

'कर्नाटकातील श्रावणबेला गोला इथं बाहुबलीचा अप्रतिम पुतळा आहे. मध्य प्रदेशातील मांडू इथं स्मारकांचा समूह आहे जो अतिशय सुंदर आहे. त्रिपुरा राज्यात उनाकोटी म्हणून ओळखलं जाणारं विलक्षण शिल्प आहे, मिझोराममधील नैसर्गिक पूल ही देवाची देणगी आहे, असं त्या म्हणाल्या.

'काश्मीरमध्ये सुंदर मुघल गार्डन आहेत. आपण तिथं जाऊन चित्रपटांचं चित्रीकरण पाहतो. पण इतकं सुंदर ठिकाण जागतिक वारसा स्थळांमध्ये नाही, हे आपल्या लक्षातही येत नाही. या स्थळांचा योग्य विकास केला पाहिजे, तिथं सुविधा असल्या पाहिजेत, जेणेकरून लोक येऊन ती पाहू शकतील. त्यातून महसूल वाढेल. २५०० वर्षे जुनी सारनाथची जुनी स्मारके अजूनही जागतिक वारसा स्थळांमध्ये नाहीत, याबद्दलही त्यांनी खंत व्यक्त केली.

WhatsApp channel
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर