सोशल मीडियाच्या आजच्या जमान्यात तरुणाईला रिल्स बनवण्याचे जणू व्यसन लागले आहे. मात्र या रील्स बनवण्याच्या नादात कोणी हत्याही करू शकते, हे समोर आले आहे. बिहारमधील बेगूसरायमध्ये पतीने रील्स बनवण्यापासून रोखल्याने संतापलेल्या पत्नीने पतीची हत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पत्नी व तिच्या बहिणीला अटक केली आहे.
ही घटना बेगूसराय जिल्ह्यातील फफौत गावातील आहे. येथे रविवारी रात्री आपल्या सासरवाडीला आलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्ट मार्टमसाठी पाठवला. मृत तरणाच्या कुटूंबीयांना पत्नीसह तिच्या माहेरच्या लोकांवर आपल्या मुलाची हत्या केल्याचा आरोप केला.
मृताच्या वडिलांनी सांगितले की, मुलाचे नाव महेश्वर राय असून त्याच्या पत्नीला इंस्टाग्राम रील बनवण्याचा नाद होता. महेश्वरने तिला रील बनवण्यास मनाई केली होती. या कारणावरून दोघांमध्ये नेहमी भांडण होत होते. याचा राग मनात धरून त्याच्या पत्नीने आपल्या माहेरच्या लोकांच्या मदतीने महेश्वर रायची हत्या केली आहे.
समस्तीपूर जिल्ह्यातील विभूतीपूर येथील महेश्वर राय याचा विवाह सहा वर्षापूर्वी बेगूसराय जिल्ह्यातील फफौत गावातील रानी कुमारी हिच्याशी झाला होता. त्यांना एक मुलगाही आहे. मागील तीन-चार वर्षापासून रानी कुमारीला इंस्टाग्रामवर रील बनवण्याचा छंद जडला होता. पत्नीचे हे काम महेश्वरला पसंद नव्हते. रविवारी रात्रीही त्याने रील बनवण्यास मनाई केल्यानंतर त्याची पत्नीसह सासरच्या लोकांनी हत्या केली. महेश्वरचा कोलकाता येथे राहणाऱ्या भावाला या घटनेची माहिती देण्यात आली. त्याने आपल्या घरच्या लोकांना भावाच्या मृत्यूची बातमी कळबली. पोलिसांनी सांगितले की, पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच स्पष्ट होईल की, महेश्वरची हत्या झाली आहे की, त्याने आत्महत्या केली. पोलिसांनी मृताची पत्नी व मेव्हुणीला ताब्यात घेऊन चौकशी करत आहेत.