उत्तरप्रदेश राज्यातील बिजनौर येथे एक अजब प्रकार समोर आला आहे. येथे काही अल्पवयीन विद्यार्थी आपल्या फेअरवेल पार्टीसाठी ट्रॅक्टरमधून शाळेत आले. यावेळी विद्यार्थ्यांनी मुलींना इम्प्रेस करण्यासाठी चालत्या ट्रॅक्टरवर डान्स करत सोशल मीडिया रिल्स बनवल्या. विद्यार्थ्यांच्या या स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान पोलीस प्रशासनानेही या घटनेची दखल घेत नोटीस पाठवून याचे उत्तर मागितले आहे. मात्र या व्हायरल व्हिडिओची पुष्टि हिन्दुस्तान टाईम्स मराठी करत नाही.
मिळालेल्या माहितीनुसार जवळपास एक महिन्यापूर्वी बिजनौर शहरातील सेंट मेरीज शाळेत विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी शाळेतील काही विद्यार्थी ट्रॅक्टरवर चढून डान्स करत शाळेत दाखल झाले. यावेळी कोणीतरी त्यांचा व्हिडिओ बनवला व सोशल मीडियावर व्हायरल केला. विद्यार्थी ट्रॅक्टरच्या बोनेटवर बसून चालत्या ट्रॅक्टरवर डान्स करत आहेत. यावेळी विद्यार्थ्यांकडून वाहतुकीच्या नियमांचेही उल्लंघन झाले. विद्यार्थ्यांचा ट्रॅक्टरवर डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी शाळा प्रशासनाला नोटीस पाठवून या प्रकाराबाबत उत्तर मागितले आहे.
याप्रकरणी एएसपी संजीव कुमार बाजपेई यांनी सांगितले की, व्हिडिओ व्हायरल झाल्याने हा प्रकार समोर आला आहे. त्यामध्ये दिसते की, काही विद्यार्थी ट्रॅक्टरच्या बोनेटवर चढून शाळेत येत आहेत. स्कूल प्रशासनाला नोटिस पाठवून यावर खुलासा मागवला आहे. दरम्यान शाळेचे फादर साजू यांनी सांगितले की, एका महिन्यापूर्वी फेअरवेल कार्यक्रमाच्या दिवशी शाळेतील काही मुले ट्रॅक्टरवर चढून शाळा परिसरात आले होते. त्यांना तत्काळ शाळेतून बाहेर काढले होते.
संबंधित बातम्या