मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  CBSE : सीबीएसई दहावीच्या परीक्षेत विद्यार्थिनीला शून्य गुण दिले; हायकोर्टानं शाळेला ठोठावला दंड

CBSE : सीबीएसई दहावीच्या परीक्षेत विद्यार्थिनीला शून्य गुण दिले; हायकोर्टानं शाळेला ठोठावला दंड

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Dec 08, 2023 11:18 AM IST

High court on CBSE marking pattern : विद्यार्थिनीला चुकून शून्य गुण देऊन त्यात सुधारणा करण्याबाबत बेफिकीरी दाखवल्याप्रकरणी हायकोर्टानं एका शाळेला दंड ठोठावला आहे.

CBSE Exam case
CBSE Exam case

CBSE Exam news : सीबीएसई दहावीच्या परीक्षेत विद्यार्थिनीला शून्य गुण देणं एका शाळेला चांगलंच महागात पडलं आहे. पंजाब-हरयाणा उच्च न्यायालयानं या शाळेला खडे बोल सुनावतानाच तब्बल ३० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसंच, बोर्डाला नव्यानं निकाल जाहीर करण्याचे निर्देशही दिले आहेत.

हे प्रकरण २०२१ चे आहे. समान नाव असलेल्या दोन विद्यार्थिनींच्या गुणांची चुकून अदलाबदल झाली. त्यातून एका विद्यार्थिनीला शून्य गुण दिले गेले. शून्य गुण मिळाल्यामुळं संबंधित विद्यार्थिनी पुढं १२वीच्या परीक्षेला बसू शकली नाही. या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी थेट न्यायालयात धाव घेतली. परीक्षेच्या निकालात सुधारणा करून सुधारीत प्रमाणपत्रं देण्याची मागणी विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी याचिकेत केली होती.

Sugar Production : साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर केंद्र सरकारची बंदी, काय आहे कारण?

या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. त्यावेळी या प्रकरणात शाळेनं अनेक चुका केल्या व बेफिकीरपणा दाखवल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आलं. 'याचिकाकर्त्यांनी शाळेकडं वारंवार तक्रारी केल्या. तेव्हा तुमचा अर्ज बोर्डाकडं पाठवण्यात आला आहे असंच उत्तर वेळोवेळी देण्यात आलं. नोटीस बजावूनही शाळेनं सहकार्य केलं नाही. याचिकेतील आरोपांना शाळेनं उत्तर दिलं नाही.

याचिकाकर्त्यानं सीबीएसई बोर्डाकडं आपली तक्रार मांडून हस्तक्षेपाची मागणी केली होती. मात्र, शाळेनं निर्धारित वेळेत ऑनलाइन पोर्टलवर सुधारित गुण सादर केले नाहीत, असंही न्यायालयात समोर आलं. त्यामुळं संतापलेल्या न्यायालयानं सुनावणी दरम्यान शाळेची खरडपट्टी काढली.

Weather Updates: कुठे थंडी तर कुठे पावसाच्या सरी कोसळणार? वाचा हवामान खात्याचा अंदाज

'शाळेनं केलेल्या चुकीमुळं केवळ याचिकाकर्त्यालाच नाही तर बोर्डालाही मनस्ताप झाला आहे. बोर्डाला विनाकारण खटल्याचा खर्च करावा लागला आहे, असं न्यायमूर्ती म्हणाले.'याचिकाकर्त्या विद्यार्थिनीनं ११वीची परीक्षा उत्तीर्ण केली असून शाळेच्या चुकीमुळे ती १२वीच्या परीक्षेला बसू शकली नाही. तिला दिलासा न दिल्यास तिचं भवितव्य धोक्यात येऊ शकतं. निष्काळजीपणाबद्दल न्यायालयानं शाळेला ३० हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसंच, हा दंड शाळेनं सीबीएसई बोर्डाला द्यावा, असंही स्पष्ट केलं.

WhatsApp channel

विभाग