panipuri ban in Karnataka : स्ट्रीट फूडचे वेड कोणाला नाही? स्ट्रीट फूडमध्ये सर्वाधिक आवडीचा पदार्थ म्हणजे पाणी-पुरी. रस्त्यावरील पाणी पुरीचा स्टॉल पाहून प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं आणि खाण्याचा मोह होतो. भारतात बहुतांश शहरातील नागरिकांचे पाणी-पुरी हे आवडते खाद्य पदार्थ आहे. मात्र, या लोकप्रिय पणीपुरीवर कर्नाटक सरकार बंदी घालण्याच्या तयारीत आहे. याचे कारणही महत्वाचे आहे. कर्नाटक सरकारने रस्त्यावर विकणाऱ्या पाणीपुरीचे अनेक नमुने घेतले असून या तपासणी अहवालात धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
रस्त्यावरील पाणी पुरीत कॅन्सरचा धोका निर्माण करणारे रासायनिक रंग आढळून आले आहेत. सरकार या प्रकरणाची चौकशी करत आहे. गरज पडल्यास पाणीपुरीवरही बंदी आणली जाऊ शकते, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यापूर्वी, सरकारने कोबी मंचुरियन आणि कृत्रिम रंगांनी तयार केलेल्या कबाबवर बंदी घातली होती.
कर्नाटक आरोग्य विभागाने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात, राज्यभरातील दुकानांमधून सुमारे २५० पाणीपुरीचे नमुने गोळा करण्यात आले. तपासणीअंती असे आढळून आले की एकूण नमुन्यांपैकी ४० नमुने अन्न सुरक्षा मानकांची पूर्तता करत नाहीत. ब्रिलियंट ब्लू, टार्डाझिन आणि सनसेट यलो यांसारख्या कॅन्सरला कारणीभूत ठरणाऱ्या रासायनिक रंगांचा मोठ्या प्रमाणात वापर पाणी पुरीत केला जात असल्याचे या तपासणीत आढळले आहे. ही रसायने मानवी आरोग्यासाठी धोकादायक आहेत, ज्यांच्या नियमित खाण्याने कर्करोगासह अनेक गंभीर आजारांचा धोका होऊ शकतो.
कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी सांगितले की, आरोग्य विभाग याप्रकरणी योग्य ती कारवाई करेल. लोकांचे आरोग्य चांगले राहावे या दिशेने एक पाऊल पुढे टाकत दिनेश गुंडू राव यांनी विभागीय अधिकाऱ्यांना रस्त्यावरील खाद्यपदार्थ बनवताना स्वच्छता राखणे, स्वयंपाक करताना काळजी घेणे आणि रासायनिक रंग न वापरण्याचे आदेश दिले आहेत.
राव म्हणाले, "कृत्रिम रंग वापरून कॉटन कँडी, मंचूरीयन आणि कबाबच्या उत्पादनावर बंदी घालण्यात आली असल्याने, राज्यात विकल्या जाणाऱ्या पाणी पुरीचे नमुने गोळा करून चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अनेक नमुन्यांच्या चाचणीत मानवी आरोगयास घातक रसायने आढळली आहे. याबाबत अधिक विश्लेषण सुरू असून, चाचणी अहवालानंतर आरोग्य विभाग योग्य ती कारवाई करेल, असे ते म्हणाले. तसेच जनतेने आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी आणि आपल्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या अन्नपदार्थांचे सेवन टाळावे, असे देखील राव म्हणाले.