भटक्या कुत्र्यांच्या दहशतीची खळबळजनक घटना समोर आली आहे. भटक्या कुत्र्यांनी वडिलांच्या बाजुला झोपलेल्या एक वर्षाच्या बाळाला आपले शिकार बनवले. चिमुकला वडिलांच्या कुशीत झोपलेला होता. त्यावेळी भटक्या कुत्र्यांची झुंड झोपडीत घुसली व त्यांनी बाळाला उचलून नेले. त्यानंतर कुत्र्यांनी बाळाचे लचके तोडले. ही दु:खद घटना तेलंगाना राज्यातील शमशाबाद येथे घडली आहे.
ही घटना गुरुवार रात्री घडली. सूर्यकुमार नावाचा व्यक्ती आपल्या एक वर्षाच्या चिमुकल्यासह झोपडीत झोपला होता. सूर्यकुमार मजुरी करून उदरनिर्वाह करतात. ते आपल्या कुटूंबासह शमशाबादमध्ये राजीव गृहकल्पा परिसरात एक झोपडीत राहतात. सूर्यकुमार आपल्या एक वर्षाचा मुलगा नागराजूसोबत झोपले होते. त्यावेळी मुलाची आई उपस्थित नव्हती. कुटूंबातील अन्य सदस्यही झोपले होते.
रात्री दीड वाजण्याच्या सुमारास स्थानिक लोकांनी पाहिले की, कुत्र्यांची झुंड एका नवजात मुलाचे लचके तोडत आहे. त्यांनी तत्काळ सूर्यकुमार यांना उठवले. सूर्यकुमार बाहेर येऊन पाहतात तर त्यांचा मुलगा मृतवत पडला होता. या घटनेनंतर सूर्यकुमार यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे. त्यांनी पोलिसांनी सांगितले की, नागराजू यांना खायला घालून रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारात ते झोपायला गेले होते. त्यावेळी त्यांना कोणत्याप्रकारचा धोका जाणवला नाही. त्यानंतर फोन करून शेजाऱ्यांनी ही वाईट बातमी दिली.
पोलिसांनी सांगितले की, मागील वर्षी मार्च महिन्यापासून शहरात मुलांवर कुत्र्यांच्या हल्ल्याची ही नववी घटना आहे. त्यांनी सांगितले की, भटक्या कुत्र्यांचे हल्ले रोखण्यासाठी त्यांची नसबंदी ते लसीकरणासारखे उपाय करण्यात आले आहेत.पोलिसांनी म्हटले की, सूर्यकुमार यांच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.