संरक्षण, अणुऊर्जा, अंतराळ आणि दहशतवाद; पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉन यांच्यात कोणकोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  संरक्षण, अणुऊर्जा, अंतराळ आणि दहशतवाद; पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉन यांच्यात कोणकोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?

संरक्षण, अणुऊर्जा, अंतराळ आणि दहशतवाद; पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉन यांच्यात कोणकोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?

Updated Feb 12, 2025 09:12 PM IST

Modi In France : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात फ्रान्स दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी विमानातही चर्चा झाली. भारत-फ्रान्स संबंध नव्या उंचीवर पोहोचल्याची पुष्टी भारताच्या परराष्ट्र सचिवांनी केली आहे.

इमॅन्युएल मॅक्रॉन आणि नरेंद्र मोदी
इमॅन्युएल मॅक्रॉन आणि नरेंद्र मोदी (AFP)

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर असून, तिथे त्यांनी फान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी आज अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. यादरम्यान, मध्यपूर्व, युरोप, परस्पर राजकीय भागीदारी यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. तसेच, दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्याचे आवाहनही दोन्ही नेत्यांनी केले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात फ्रान्स दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी विमानातही चर्चा झाली. भारत-फ्रान्स संबंध नव्या उंचीवर पोहोचल्याची पुष्टी भारताच्या परराष्ट्र सचिवांनी केली आहे. मोदी आणि मॅक्रॉन यांनी द्विपक्षीय सामरिक भागीदारी, जागतिक मुद्दे, दहशतवाद, युरोप, मध्य पूर्व आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील भूराजकीय घडामोडींवर विचारांची देवाणघेवाण केली.

जागतिक  समस्यांवर चर्चा -

दौरा संपण्यापूर्वी संयुक्त निवेदनात दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय भागीदारीसाठी आपल्या सामायिक दृष्टीकोनाचा पुनरुच्चार केला. उभय नेत्यांनी द्विपक्षीय सहकार्यात झालेल्या प्रगतीचे कौतुक केले आणि ते पुढे नेण्याची वचनबद्धता व्यक्त केली. द्विपक्षीय चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांनी इंडो-पॅसिफिक आणि रशिया-युक्रेन युद्धासह अनेक वादग्रस्त मुद्द्यांवर चर्चा केली. संरक्षण, अणुऊर्जा आणि अंतराळ या सारख्या क्षेत्रात सामरिक भागीदारी आणि सहकार्यावरही त्यांनी चर्चा केली. तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण क्षेत्रातील सहकार्याबाबतही त्यांनी चर्चा केली.

२०२६ मध्ये भारत-फ्रान्स इनोव्हेशन वर्ष -

भारत सरकारनेही या महत्त्वाच्या दौऱ्याबाबत निवेदन जारी केले आहे. या चर्चेत भारत-फ्रान्स सामरिक भागीदारीच्या सर्व बाबींवर चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी संरक्षण, नागरी अणुऊर्जा आणि अंतराळ या सामरिक क्षेत्रातील सहकार्याचा आढावा घेतला. तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण क्षेत्रात सहकार्य बळकट करण्याच्या मार्गांवरही त्यांनी चर्चा केली. नुकत्याच पार पडलेल्या एआय अॅक्शन समिट आणि २०२६ मध्ये आगामी भारत-फ्रान्स इनोव्हेशन वर्षाच्या पार्श्वभूमीवर भागीदारीचे हे क्षेत्र अधिक महत्वाचे आहे. दोन्ही नेत्यांनी व्यापार आणि गुंतवणूक संबंध वाढविण्याचे आवाहन केले आणि यासंदर्भातील १४ व्या भारत-फ्रान्स सीईओ फोरमच्या अहवालाचे स्वागत केले.

दोन्ही नेत्यांचा एकत्रित विमान प्रवास -

मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसोबत आपल्या विमानाने पॅरिस ते मार्सेले असा प्रवास केला. दोन्ही नेत्यांनी इंडो-पॅसिफिक आणि जागतिक व्यासपीठे आणि उपक्रमांमध्ये आपले संबंध दृढ करण्यासाठी वचनबद्धता व्यक्त केली. बुधवारी मोदी यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासमवेत मार्सेल शहरातील ऐतिहासिक मजारगुएझ युद्ध स्मशानभूमीला भेट दिली आणि पहिल्या महायुद्धात प्राणांची आहुती देणाऱ्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान मोदींनी तिरंगी फुलांपासून बनवलेल्या पुष्पचक्र अर्पण केले. मॅक्रॉन यांनी ही भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहिली.

पहिल्या महायुद्धात प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांना श्रद्धांजली -

पहिल्या महायुद्धात फ्रेंचांच्या खांद्याला खांदा लावून आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या भारतीय सैनिकांचे स्मरण करताना मोदींनी 'इंडियन मेमोरियल' असलेल्या या ऐतिहासिक स्थळाला आदरांजली वाहिली.  त्यानंतर दोन्ही नेत्यांनी ऐतिहासिक स्मशानभूमी परिसराला भेट देऊन स्मारकाच्या फलकावर गुलाबपुष्प अर्पण केले.

या स्मशानभूमीत मोठ्या संख्येने भारतीय सैनिकांची स्मारके आहेत. कॉमनवेल्थ वॉर ग्रेव्हज कमिशन (सीडब्ल्यूजीसी) या स्मशानभूमीची देखभाल करते. फ्रान्सच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या मोदी यांनी मंगळवारी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासमवेत एआय अॅक्शन समिटचे सहअध्यक्षपद भूषवले आणि उद्योजकांना संबोधित केले. मोदी १० फेब्रुवारीला पॅरिसमध्ये दाखल झाले होते. 

Shrikant Ashok Londhe

TwittereMail

श्रीकांत लोंढे हिंदुस्तान टाइम्स-मराठी मध्ये चीफ कन्टेन्ट प्रोड्यूसर आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय, राजकीय व गुन्हेविषयक बातम्या कव्हर करतो. प्रिंट आणि डिजिटलमध्ये एकूण १४ वर्षांचा अनुभव. यापूर्वी दैनिक लोकमत, लोकमत समाचार, ईनाडू न्यूज, ईटीव्ही-भारत मध्ये रिपोर्टिग आणि डेस्कवरील कामाचा अनुभव. विशेष स्टोरीज, क्रीडा, राजकारण, मनोरंजन तसेच बिझनेसच्या बातम्याही कव्हर करतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर