Stone Pelting On Vande Bharat Express : देशातील अनेक शहरांमध्ये वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून आणखी काही शहरांमध्ये ही रेल्वे सुरू करण्याची तयारी सुरू असतानाच आता धक्कादायक घटना समोर आली आहे. गोरखपूरहून लखनौच्या दिशेने जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनवर दगडफेक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्या शहर परिसरात अज्ञात आरोपींनी लोहमार्गाच्या दोन्ही बाजूंनी रेल्वेवर दगडफेक केली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी केलेल्या दगडफेकीत वंदे भारत एक्स्प्रेसच्या दोन डब्यांचा काचा फुटल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोरखपूरहून लखनौला निघालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसवर सोहवाल रेल्वे स्थानकाजवळ अचानक काही आरोपींनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. दोन दिवसांपूर्वी वंदे भारत एक्स्प्रेसने सहा शेळ्या उडवल्याच्या रागातून आरोपींनी ट्रेनवर हल्ला केल्याचं तपासातून उघड झालं आहे. आरोपींच्या शेळ्या रुळाजवळ चरत होत्या. त्याचवेळी रेल्वेने धडक दिल्याने सहा शेळ्या ठार झाल्या होत्या. शेळ्यांच्या मृत्यूचा बदला म्हणून आरोपींनी रेल्वेवर तुफान दगडफेक केली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच आरपीएफ आणि पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मुन्नू पासवान आणि त्यांची दोन मुलं अजय पासवान आणि विजय पासवान यांच्यासह तिघांना अटक केली आहे.
आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती आहे. आरोपींनी केलेल्या दगडफेकीत कोणत्याही प्रवाशाला इजा झालेली नाही. परंतु रेल्वेच्या दोन डब्यांचं मात्र मोठं नुकसान झालेलं आहे. दोन्ही डब्यांच्या खिडक्या पूर्णपणे फुटल्या आहे. गेल्या महिन्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरखपूर ते लखनौ दरम्यानच्या वंदे भारत एक्स्प्रेचं उद्घाटन केलं होतं. रेल्वे सुरू झाल्याच्या काही दिवसांतच त्यावर दगडफेक करण्यात आल्याची घटना समोर आल्याने उत्तर प्रदेशात खळबळ उडाली आहे.
संबंधित बातम्या