Vande bharat train : वंदे भारत ट्रेनवर दगडफेक, खिडकीच्या काचा फोडल्या-stone pelted on vande bharat express train ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Vande bharat train : वंदे भारत ट्रेनवर दगडफेक, खिडकीच्या काचा फोडल्या

Vande bharat train : वंदे भारत ट्रेनवर दगडफेक, खिडकीच्या काचा फोडल्या

Sep 14, 2024 06:18 PM IST

vande bharat train - दुर्ग ते विशाखापट्टणम दरम्यान लवकरच वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन धावणार आहे, या ट्रेनची चाचणी नुकतीच घेण्यात आली. चाचणी सुरू असताना छत्तीसगडच्या महासमुंद जिल्ह्यात या ट्रेनवर दगडफेकीची घटना घडली आहे.

Vande Bharat Train (File Photo)
Vande Bharat Train (File Photo)

‘वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन’ ही भारतात ट्रेन प्रवासासाठी जलदगतीने धावणारी आणि अतिशय आरामदायक ट्रेन म्हणून गणली जाते. भारतात हळूहळू अनेक मार्गांवर ही ट्रेन सुरू होत आहे. छत्तीसगडमधील दुर्ग शहरातून आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम शहरादरम्यान आता लवकरच वंदे मातरम एक्स्प्रेस ट्रेन धावणार आहे. मात्र या ट्रेनच्या अधिकृत उदघाटनाच्या दोन दिवस आधी चाचणीदरम्यान काही लोकांनी या ट्रेनवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. दुर्ग ते विशाखापट्टणम दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेसची चाचणी सुरू होती. शुक्रवारी रात्री विशाखापट्टनमहून दुर्गकडे जाताना छत्तीसगडच्या बागबहरा (जिल्हा महासमुंद) रेल्वे स्थानकातून ही ट्रेन धावत असताना दगडफेकीची घटना घडली असल्याचे रेल्वे सुरक्षा दलाचे (महासमुंद) निरीक्षक प्रवीण सिंह धाकड यांनी सांगितले. या घटनेत वंदे भारत ट्रेनच्या तीन डब्यांच्या खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या आहे. दगडफेक करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. दुर्ग-विशाखापट्टनम ‘वंदे भारत ट्रेन’ला १७ सप्टेंबर रोजी दुर्ग येथे हिरवा झेंडा दाखवणार आहे.

वंदे भारत ट्रेनवर दगडफेक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांमध्ये देवेंद्र चंद्राकर, शिवकुमार बघेल, अर्जुन यादव, जितू तांडी आणि लेखराज सोनवणी या आरोपींचा समावेश आहे. हे सर्व जण बागबहारा येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटक करण्यात आलेला एक आरोप शिवकुमार बघेल याची वहिनी बागबहारा येथे नगरसेविका आहेत. 

आरपीएफच्या चार जवानांच्या ट्रेन एस्कॉर्ट टीमने या घटनेची सर्वप्रथम ही माहिती दिली. दगडफेकीच्या घटनेनंतर सुरक्षा रक्षकांचे अतिरिक्त पथक घटनास्थळी पाठविण्यात आले असल्याची माहिती पोलीसांनी दिली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींवर रेल्वे कायदा १९८९ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात कलम १५३ (जाणूनबुजून किंवा चुकून रेल्वेतून प्रवास करणाऱ्या व्यक्तीची सुरक्षितता धोक्यात आणणारी व्यक्ती पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते).

देशात यापूर्वीही अशा प्रकारच्या काही घटना घडलेल्या आहेत. ऑगस्ट महिन्यात अहमदाबाद-जोधपूर वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन राजस्थानच्या पाली जिल्ह्यात रेल्वे रुळावर ठेवलेल्या सिमेंटच्या स्लॅबवर आदळली होती. ट्रेनचं कॅटलगार्ड सिमेंट स्लॅबवर आदळलं होतं. जून महिन्यात फगवाडा ते गोराया रेल्वे दरम्यान नवी दिल्लीला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनवर दगडफेक करण्यात आली होती. 

दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बीईएमएलच्या रेल्वे कोच फॅक्टरीत ‘वंदे भारत स्लीपर कोच’च्या प्रोटोटाइप आवृत्तीचं उदघाटन केलं होतं. पुढील दहा दिवस या ट्रेनच्या कठोर चाचण्या घेण्यात येणार आहे. त्यानंतरच ही ट्रेन रुळावर धावण्यास सज्ज होणार आहे.

Whats_app_banner