STF Odisha : पाकिस्तानी गुप्तचरांना शेअर केला ओटीपी ; एसटीएफकडून तिघांना अटक
Crime News Today : पाकिस्तानी गुप्तहेर आणि आयएसआयला ओटीपी शेयर करणाऱ्या तीन आरोपींना स्पेशल टास्क फोर्सने अटक केल्याची माहिती समोर आली आहे.
Odisha Crime News Today : पाकिस्तानी गुप्तहेर आणि इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स म्हणजेच आयएसआयला ओटीपी शेयर करणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ओडिशा पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) मोठी कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानला भारताच्या संरक्षणविषयक गुप्त माहिती शेयर केल्याच्या आरोपाखाली डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता पाकिस्तानी हेरांना ओटीपी शेयर करणाऱ्या टोळीचा एसटीएफने पदार्पाश केला आहे. त्यामुळं खळबळ उडाली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
सोशल मीडियावरून पाकिस्तानी हेर आणि आयएसआयला गुप्त माहिती पुरवली जात असल्याची माहिती ओडिशातील एसटीएफला मिळाली होती. त्यानंतर तपास यंत्रणांनी राष्ट्रविरोधी कारवाया करणाऱ्या शिक्षकासह अन्य तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहे. सरोज कुमार आणि सौम्या पट्टनाईक असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहे. त्यानंतर आता तपास यंत्रणांकडून आरोपींची चौकशी केली जात आहे. आरोपींनी देशातील वेगवेगळ्या भागातून सीमकार्ड खरेदी करून पाकिस्तानी गुप्तहेरांना ओटीपीद्वारे माहिती पुरवल्याचा आरोप तपास यंत्रणांनी केला आहे. याशिवाय आयएसआय आणि पाकिस्तानी हेरांनी तिन्ही आरोपींना त्या बदल्यात लाखो रुपये दिल्याची माहिती आहे. त्यानंतर आता या प्रकरणात एसटीएफने कारवाई करत तिघांना अटक केली आहे.
आरोपींनी नवनव्या सीमकार्ड्सचा वापर करून सोशल मीडियाद्वारे असंख्य खाती तयार करून पाकिस्तानी हेरांना माहिती पुरवली होती. तसेच हेरगिरी, दहशतवाद्यांशी संवाद, कट्टरतावाद, भारतविरोधी प्रचार, फुटीरतावादी विचारांना खतपाणी घालणे आणि देशविरोधी कारवायांसाठी भारतीय सीमकार्ड्स आणि सोशल मीडियाचा वापर केल्याचा आरोपही एसटीएफने केला आहे.