Stampede in Tirupati Tirumala Temple : आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील भगवान व्यंकटेश्वर मंदिराच्या वैकुंठ गेटवर झालेल्या चेंगराचेंगरीत ६ भाविकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. दर्शनासाठी टोकन वितरण करत असताना लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. या घटनेत १० जण जखमी झाले आहेत. या घटनेत मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. तिरुपतीतील विष्णू निवास आणि रामानायडू स्कूल परिसरात ही घटना घडली. अनेक गंभीर जखमींना रुया रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
टोकन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक जमले असताना चेंगराचेंगरी झाली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तिरुपती मंदिर परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी या घटनेतील जखमींवर करण्यात येत असलेल्या उपचारांबाबत अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. मुख्यमंत्री वेळोवेळी जिल्हा व टीटीडीच्या अधिकाऱ्यांशी बोलून सद्यस्थितीची माहिती घेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले आहेत.
घटनास्थळावरील व्हिडिओमध्ये चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती दिसून येत आहे. या घटनेनंतर तात्काळ रुग्णवाहिका जखमींना घेऊन रुग्णालयात दाखल झाल्या. या व्हिडिओमध्ये अनेक भाविक जमिनीवर पडलेले दिसत आहेत. पोलिस व इतरही त्यांना सीपीआर देताना दिसत आहेत. तर काही भाविकांना खुर्चीवर बसून सुरक्षित स्थळी नेले जात आहे.
तिरुमला टेकडीवरील भगवान व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात वैकुंठ द्वारा दर्शनम् च्या तिकिटांसाठी शेकडो भाविक धडपड करताना दिसत आहेत.
१० जानेवारीपासून सुरू होणाऱ्या १० दिवसांच्या वैकुंठ द्वारा दर्शनासाठी देशभरातून भाविक आले होते.
वैकुंठ द्वार दर्शन दहा दिवसांसाठी खुले करण्यात आले आहे. यावेळी मोठ्या संख्येने भाविक जमा झाले आणि चेंगराचेंगरी झाली. तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) ने १० जानेवारी रोजी वैकुंठ एकादशीच्या दिवशी टोकनसाठी अलिपिरी, श्रीनिवासपुरम आणि इतर भागातील नऊ केंद्रांवर ९४ काउंटर उघडले होते.
माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनीही चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांप्रती तीव्र संवेदना व्यक्त केल्या आणि जखमींना सर्वोत्तम उपचार देण्याचे आवाहन सरकारकडे केले. या ठिकाणची परिस्थिती सुधारण्यासाठी युद्धपातळीवर तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणीही त्यांनी केली. या महिन्याच्या १०, ११ आणि १२ तारखेला वैकुंठद्वार सर्वदर्शन टोकन देण्यात येत आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानने (टीटीडी) गुरुवारी पहाटे पाच वाजल्यापासून टोकन देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी बुधवारी सायंकाळपासूनच टोकन देणाऱ्या केंद्रांवर भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.
टीटीडीचे अधिकारी दररोज ४० हजार प्रमाणे तीन दिवसात १ लाख २० हजार टोकन देणार आहेत. त्याचबरोबर वैकुंठ द्वार सर्व दर्शन टोकनसाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. श्रीनिवासम, विष्णू निवासम, रामचंद्र पुष्कर्णी, अलिपिरी भूदेवी कॉम्प्लेक्स, एमार पल्ली जिल्हा परिषद हायस्कूल, बैरागीपट्टेडा रामानायडू हायस्कूल, सत्यनारायण पुरम झेडपी हायस्कूल आणि इंदिरा मैदान येथे टोकन केंद्र सुरू करण्यात आली आहेत.
संबंधित बातम्या