Jaya Kishori News: देशातील सुप्रसिद्ध आध्यात्मिक प्रचारक आणि गायिका जया किशोरी वेगळ्याच कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी जया किशोरी ब्रँडेड बॅग घेऊन विमानतळावर दिसल्या होत्या. दोन लाख रुपयांहून अधिक किमतीच्या कस्टमाइज्ड डायर बॅगमुळे लोकांनी त्यांना प्रचंड ट्रोल केले. जया किशोरी यांच्याजवळ दिसलेली बॅग गायीच्या चामड्यापासून बनवण्यात आली, असा अनेकांनी दावा केल्याने वाद निर्माण झाला आहे. यावर जया किशोरी यांनी स्पष्टीकरण दिले. मी स्वाध्वी नाही, सामन्य मुलगी आहे. मी कधीही इच्छा त्याग करण्याचे समर्थन केले नाही. तरुणांनी मेहनत करावी, पैसे कमवावेत आणि आपल्या आवडीप्रमाणे खर्च करावेत, असे त्या म्हणाल्या. तसेच मी कधीही चामड्याचा वापर केलेला नाही आणि वापरणारही नाही, असेही तिने म्हटले आहे.
गायीच्या कातड्याचा वापर करणारी डायरची बॅग बाळगल्याबद्दल अनेक जणांनी सोशल मीडियावर ट्रोल केल्यानंतर जया किशोरी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधला. जया किशोरी म्हणाल्या की, माझ्या हातात दिसलेली बॅग कस्टमाइज्ड बॅग आहे. यात कोणत्याही प्रकारच्या चामड्याचा वापर करण्यात आले नाही. कस्टमाइज्ड बॅग म्हणजे, तुम्ही तुमच्या इच्छेनुसार, ते बनवू शकतात. त्यावर माझे नाव लिहिले आहे. मी कधीही चामड्याचा वापर केलेला नाही आणि वापरणारही नाही, असे तिने एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
एएनआयशी बोलताना ती म्हणाली की, ‘जे माझ्या प्रवचनांना हजेरी लावतात, त्यांना माहिती आहे की, मी कधीच त्यांना इच्छा त्याग करण्यास किंवा पैसे कमवू नका, असे सांगितले नाही. मी कुठल्याही गोष्टीचा त्याग केलेला नाही. मग मी इतरांना असे कसे सांगू? मी संत, साधू किंवा साध्वी नाही, हे मी आधीच स्पष्ट केले आहे. मी एक सामान्य मुलगी आहे, मी सामान्य घरात राहते, मी माझ्या कुटुंबासह राहते. मी नेहमी तरुणांना सांगते की, मेहनत करा, पैसे कमवा आणि चांगले आयु्ष्य जगा आणि कुटुंबाला चांगले आयुष्य द्यावे आणि आपली स्वप्ने पूर्ण करावीत.’
काही एक्स वापरकर्त्यांनी गायीच्या चामड्याबाबत तिची भूमिका स्पष्ट केल्याबद्दल तिचे कौतुक केले, तर काहींनी एएनआयशी झालेल्या संभाषणाला डॅमेज कंट्रोल उपाय म्हटले. एका व्यक्तीने म्हटले आहे की, साध्वीचा पोशाख परिधान करून प्रवचन करायचे आणि म्हणायचे मी साध्वी नाही, याला फसवणूक म्हणतात. दुसऱ्या व्यक्तीने म्हटले आहे की, 'डायरने चामड्याशिवाय बॅग बनवल्याचे कधीच ऐकले नाही.'