मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Spicejet Plane : उडत्या विमानात धुराचे लोट, इमर्जन्सी लँडिंग केल्यानं अनर्थ टळला; प्रवासी सुखरूप
spicejet plane emergency landing
spicejet plane emergency landing (HT)

Spicejet Plane : उडत्या विमानात धुराचे लोट, इमर्जन्सी लँडिंग केल्यानं अनर्थ टळला; प्रवासी सुखरूप

13 October 2022, 14:43 ISTAtik Sikandar Shaikh

spicejet plane emergency landing : विमानानं उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच त्यात धुराचे लोट तयार झाल्यानं प्रवाशांनी प्रचंड घाबरलेले होते. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

spicejet plane emergency landing : गोव्यातील पणजीसाठी उड्डाण केलेल्या विमानात काही मिनिटांतच कॉकपिट आणि केबिनमधून धुराचे लोट पसरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळं पायलटनं प्रसंगावधान राखत तात्काळ हैदराबाद विमानतळावर इमर्जेन्सी लॅंडिंग केल्यानं मोठा अपघात टळला आहे. अचानक विमानात तयार झालेल्या धुरामुळं प्रवासी प्रचंड घाबरलेले होते. त्यानंतर विमान सुरक्षितक्षितरित्या खाली उतरल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. या घटनेत काही प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्याचीही माहिती समोर येत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, स्पाइसजेट कंपनीचं क्यू-४०० एयरक्राफ्ट व्हिटी-एसक्यूबी हे विमान ८६ प्रवाशांना घेऊन पणजीसाठी निघालं. परंतु उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच त्याच्या कॉकपिट आणि केबिनमधून धुराचे लोट निघू लागले. त्यामुळं काही प्रवाशांना श्वसनाचाही त्रास जाणवू लागला. ही बाब पायलटच्या लक्षात येताच त्यानं तात्काळ हैदराबाद विमानतळावर विमान उतरवलं.

या अपघातग्रस्त विमानातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशानं त्याच्या ट्विटर हॅंडलवर या घटनेचे काही फोटो आणि व्हिडिओ शेयर केले आहेत. त्यात विमानात चोहीकडे धूर पसरल्याचं दिसत असून व्हिडिओत विमान सुरक्षितरित्या लॅंडिंग करत असल्याचं दिसत आहे. 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' या व्हायरल व्हिडिओची पुष्टी करत नाही.

स्पाइसजेटच्या विमानात बिघाड झाल्याची घटना समोर आल्यानंतर आता या प्रकरणाची कंपनीकडून चौकशी केली जात आहे. विमानात धूर कसा काय निघाला, त्यामागं काय नेमकी कारणं आहेत?, की या घटनेमागे घातपात घडवण्याचा कुणाचा प्रयत्न होता?, याची चौकशी केली जात असल्याचं डीजीसीएकडून सांगण्यात आलं आहे.