नवी दिल्ली – काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी परदेश दौऱ्यावरून परतताच एक पदार्थ आवडीने खातात. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, सोनियांना तुरीची डाळ व भात खुप पसंत आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेल्या एका व्हिडिओत सोनिया गांधी यांनी आपल्या आवडीचा खाद्यपदार्थ सांगितला आहे. व्हिडिओमध्ये राहुल व सोनिया संत्र्याचा मुरब्बा (जॅम) बनवताना दिसत आहेत.
व्हिडिओमध्ये राहुल म्हणतात की, त्यांची बहीण प्रियंका यांची ही रेसीपी आहे. ‘मां,यादें और मुरब्बा’ नावाच्या या व्हिडिओमध्ये दोघे मायलेक जेवणाविषयी हल्का फुलका विनोद करताना दिसत आहेत. मुरब्बा बनवताना राहुल गांधी म्हणतात की, जर भाजपच्या लोकांना जॅम पाहिजे असेल तर ते सुद्ध घेऊ शकतात. काय म्हणतेस मम्मी? यावर सोनिया गांधी म्हणतात की, ते परत आपल्यावर फेकतील. त्यानंतर राहुल गांधी हसू लागतात व म्हणतात की, आम्ही हे पुन्हा उचलु शकतो.
व्हिडिओमध्ये राहुल गांधी संत्र्यांची साड काढणे व मुरब्बा तयार करण्याच्या रेसिपीबाबत सांगताना दिसतात. राहुल गांधी म्हणतात की, ही रेसिपी माझी बहीण प्रियंका गांधीची आहे.
सोनिया गांधींनी सांगितले की, मला भारतीय पदार्थांमध्ये मिरची व कोथिंबीर सोबत जमवण्यास थोडा वेळ लागला. सोनिया म्हणतात की, त्यांना कोथिंबीर पसंत नव्हती. यावर चुटकी घेताना राहुल म्हणतात की, मात्र आता त्यांना खुप पसंत आहे. राहुल म्हणतात की, त्यांना (सोनिया) लोणचे सुद्धा आवडत नव्हते मात्र आता आवडते.
सोनिया गांधी यांनी म्हटले की, मला थोडा वेळ लागला मात्र आता मला हे पदार्थ आवडतात. आता जेव्हा कधी मी परदेश दौऱ्यावरून परत येते तेव्हा सर्वात आधी मला कोणता पदार्थ हवा असेल तर तो म्हणजे तुरीची डाळ व भात. व्हिडिओमध्ये राहुल गांधी म्हणतात की, महात्मा गांधी यांचा भोजनाविषयी एक विशेष दृष्टिकोण होता. पौष्टिक जेवणाबाबत त्यांच्याकडे ज्ञानाचा खजिना होता.