लोकसभेच्या निकालातून भाजप धडा घेईल असं वाटलं होतं, पण…; सोनिया गांधी यांचा जोरदार हल्लाबोल
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  लोकसभेच्या निकालातून भाजप धडा घेईल असं वाटलं होतं, पण…; सोनिया गांधी यांचा जोरदार हल्लाबोल

लोकसभेच्या निकालातून भाजप धडा घेईल असं वाटलं होतं, पण…; सोनिया गांधी यांचा जोरदार हल्लाबोल

Jul 31, 2024 03:21 PM IST

Sonia Gandhi targets bjp and modi govt : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी सत्ताधारी भाजप व केंद्रातील एनडीए सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

लोकसभेच्या निकालातून भाजप धडा घेईल असं वाटलं होतं, पण नाही; सोनिया गांधी यांचा जोरदार हल्लाबोल
लोकसभेच्या निकालातून भाजप धडा घेईल असं वाटलं होतं, पण नाही; सोनिया गांधी यांचा जोरदार हल्लाबोल

Sonia Gandhi targets bjp and modi govt : 'लोकसभा निवडणुकीच्या निकालातून भारतीय जनता पक्ष काही धडा घेईल असं वाटलं होतं, पण तसं झालेलं नाही. समाजामध्ये फूट पाडण्याचं व माणसां-माणसांमध्ये शत्रुत्व निर्माण करण्याचं त्यांचं काम सुरूच आहे,' अशी बोचरी टीका काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी आज केली.

काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीला संबोधित करताना त्या बोलत होत्या. केंद्रीय अर्थसंकल्प, मणिपूर हिंसाचार, जात गणना आणि जम्मू-काश्मीरमधील अलीकडील हल्ल्यांसह विविध मुद्द्यांवरून त्यांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं. 'मोदी सरकार गोंधळलेलं आहे. लोकसभेच्या निकालातून मोदी सरकार योग्य तो धडा घेईल, अशी आम्हाला आशा होती. पण तसं झालेलं दिसत नाही. ते लोकांमध्ये फूट पाडण्याचं आणि शत्रुत्वाचं वातावरण पसरवण्याचं काम करतच आहेत. सरकार कसं चाललं आहे हे काही उदाहरणांवरून कळेल. सरकारी पदांवर काम करणाऱ्यांना RSS च्या कार्यात सहभागी होण्याची परवानगी देण्यासाठी अचानक नियम बदलण्यात आले आहेत. आरएसएस स्वत:ला सांस्कृतिक संघटना म्हणवून घेते, मात्र, ही संघटना भाजपचा राजकीय आणि वैचारिक पाया आहे हे संपूर्ण जगाला माहीत आहे, असं सोनिया गांधी म्हणाल्या.

सरकार आणि नेते सगळेच गोंधळलेत!

देशातील वाढत्या रेल्वे अपघातांवरही त्यांनी भाष्य केलं. 'हा गैरव्यवस्थापनाचा परिणाम आहे आणि हे अत्यंत दुर्दैवी आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातही सरकारनं शेतकरी आणि तरुणांच्या मागण्यांकडं दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. पंतप्रधानांनी अर्थसंकल्पाबाबत मोठमोठ्या बाता मारल्या, प्रत्यक्षात निराशाच पदरी पडली. देशभरातील कोट्यवधी कुटुंबं वाढती बेरोजगारी आणि महागाईनं त्रस्त आहेत. सरकारसह सरकारमधील बडे नेतेही संभ्रमात आहेत, असा दावा सोनियांनी केला.

जम्मू-काश्मीर आलबेल असल्याचा दावा फसवा

सोनिया गांधी यांनी जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त केली. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं ही अत्यंत अस्वस्थ करणारी बातमी आहे. एकट्या जम्मू भागात गेल्या काही आठवड्यांत किमान अकरा दहशतवादी हल्ले झाले आहेत. काश्मीर खोऱ्यातही असेच हल्ले झाले आहेत. सुरक्षा जवान आणि मोठ्या संख्येनं नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये सर्व काही आलबेल आहे हा सरकारचा दावा फसवा आहे, हेच यावरून दिसतं, असं सोनिया म्हणाल्या.

वातावरण आपल्या बाजूनं आहे, आत्मसंतुष्ट राहू नका!

‘पुढच्या चार महिन्यांत काही राज्यात निवडणुका होणार आहेत. लोकसभा निवडणुकीत निर्माण झालेलं वातावरण कायम राखून येणाऱ्या निवडणुकांमध्ये एकदिलानं काम करण्याचं आवाहन सोनिया गांधी यांनी कार्यकर्त्यांना केलं. राज्यातील कामगिरीमुळं राष्ट्रीय राजकारणात बदल घडू शकतो, असं त्या म्हणाल्या. 'हे सकारात्मक वातावरण आपल्याला टिकवायचं आहे. आत्मसंतुष्ट राहू नका आणि अतिआत्मविश्वासानं वागू नका, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर