Sonam Wangchuk protest : लडाखच्या पर्यावरण संदर्भात काम करणारे तसेच शास्त्रज्ञ आणि समाज सेवक सोनम वांगचुक यांनी सुरू केलेले उपोषण तब्बल २१ दिवसांनी मागे घेतले. लडाखला राज्याचा दर्जा मिळावा आणि लडाखचा संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्यात यावा या मागणीसाठी ते उपोषणाला बसले होते. तब्बल २१ दिवस केवळ पाणी पिऊन सरकारविरोधात त्यांचा लढा सुरू ठेवला होता. तब्बल २१ दिवसांनी उपोषण मागे घेतल्यावर आपला लढा सुरूच राहणार असल्याचे वांगचुक म्हणाले.
सोनम वांगचुक म्हणाले, 'मी लडाखच्या घटनात्मक रक्षणासाठी आणि लोकांच्या राजकीय हक्कांसाठी लढा सुरूच ठेवणार आहे.' केंद्रशासित प्रदेशातील विविध भागांतून आज हजारो लोक एकत्र आले आणि महिला आता सरकार विरोधात लढा उभारणार आहेत.
सोनम वांगचुक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचे आवाहन केले होते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांची प्रकृती खालवल्याचे दिसत होते. लडाखच्या लोकांना राष्ट्रहितासाठी यावेळी 'अत्यंत काळजीपूर्वक' मतदान करण्याचे आवाहन केले.
लेह आणि कारगिल लोकशाही आघाडी संयुक्त प्रतिनिधींमध्ये झालेल्या चर्चेच्या एका दिवसानंतर ६ मार्च रोजी त्यांनी संप सुरू केला होता. वांगचुक यांनी त्यांचे उपोषण हाडे गोठवणाऱ्या थंडीत शून्याखालील तापमानात चालू ठेवले. लडाखला राज्याचा दर्जा मिळावा आणि त्याचा सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी या दोन्ही संघटना संयुक्तपणे आंदोलनाचे नेतृत्व करत असल्याची माहिती आहे.
१. लडाखला राज्याचा दर्जा मिळावा अशी सोनम वांगचुकची मागणी आहे.
२. लडाखचा सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करावा असे त्यांचे म्हणणे आहे.
३. लेह आणि कारगिल जिल्ह्यांसाठी स्वतंत्र लोकसभेच्या जागांचीही मागणी आहे.
४. लडाखमध्ये स्थानिक लोकांसाठी विशेष जमीन आणि नोकरीच्या हक्कांची मागणी केली जात आहे.
५. वांगचुक सातत्याने लोकसेवा आयोग स्थापन करण्याची मागणी केली आहे.
सहाव्या अनुसूचीमध्ये स्वायत्त जिल्हा परिषदांमार्फत आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराममधील आदिवासी क्षेत्रांच्या प्रशासनाशी संबंधित तरतुदी आहेत. बॉलीवूड ब्लॉकबस्टर ३ इंडियन्समधील आमिर खानचे रँचो हे पात्र वांगचुकच्या यांच्या जीवनातून प्रेरित आहे.
वांगचुक म्हणाले, 'भारत ही लोकशाहीची जननी आहे आणि आपल्या नागरिकांमध्ये एक विशेष शक्ती आहे. आम्ही निर्णायक भूमिकेत आहोत, आम्ही कोणत्याही सरकारला त्याचे मार्ग बदलण्यास भाग पाडू शकतो. सरकार काम करत नसल्यास सरकार बदलू देखील शकतो. यावेळी राष्ट्रीय हितासाठी तुमचा मताधिकार अतिशय काळजीपूर्वक वापरण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. लोकसभा निवडणुकीसाठी लडाखमध्ये २० मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे.