आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यात एका महिलेने आपल्या मुलाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आला आहे. मुलाने मावशीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याने संतापलेल्या आईने त्याची हत्या केली. महिलेने मुलावर कुऱ्हाड किंवा धारदार शस्त्राने वार केल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांपासून वाचण्यासाठी नातेवाइकांच्या मदतीने मुलाच्या मृतदेहाचे पाच तुकडे केले. मृतदेहाचे तुकडे तीन पोत्यात भरून जवळच्या कुंबाम गावातील नकलागंडी कालव्यात फेकण्यात आले.
प्रकाशम जिल्हा पोलिस अधिकारी ए. आर. दामोदर यांनी सांगितले की, लक्ष्मी देवी (५७) ही महिला आपल्या मुलाच्या अशोभनीय आणि बेजबाबदार वागणुकीमुळे वैतागली होती. त्यांचा मुलगा अविवाहित असून तो सफाई कामगार म्हणून काम करत होता. १३ फेब्रुवारी रोजी महिलेने धारदार शस्त्राने त्याची हत्या केली. या हत्येत लक्ष्मी देवीसह तिच्या इतर नातेवाईकांनीही तिला मदत केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत प्रसाद याने बेंगळुरू, खम्मम आणि हैदराबाद येथे मावशी आणि इतर नातेवाईकांवर बलात्काराचा प्रयत्न केला होता. तो पकडला गेला तेव्हा आई आणि मुलामध्ये बराच वाद झाला होता. त्यानंतर हैदराबाद आणि नरसारावपेटा येथेही त्याने आपल्या मावशीवर बलात्काराचा प्रयत्न केला. या सर्व घटनांना कंटाळून त्याच्या आईने त्याची हत्या केली.
हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने तिने मृतदेहाचे तुकडे करून कालव्यात फेकून दिले. सध्या या प्रकरणातील सर्व आरोपी फरार आहेत. त्यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १०३ आणि २३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
संबंधित बातम्या