Manasa couple double murder who live in live in : पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील बुधलाडा शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्याची कुटुंबीयांनी धारदार शस्त्रांनी हत्या करून मृतदेह भाक्रा कालव्यात फेकून दिला.. गुरप्रीत सिंग आणि गुरप्रीत कौर अशी मृतांची नावे असून ते बोहा येथील रहिवासी आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांवर गुन्हा दाखल केला असून धक्कादायक बाब म्हणजे महिलेच्या मुलाने आणि वडिलांनी मिळून हा कट रचला.
बोहा येथील रहिवासी गुरप्रीत सिंग आणि गुरप्रीत कौर हे दोघे त्यांच्या कुटुंबीयांच्या इच्छेविरुद्ध लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. गुरप्रीत सिंग आधीच विवाहित होता आणि दोन मुलांचा बाप होता. रविवारी गुरप्रीत सिंग हा गुरप्रीत कौर सोबत बोहा येथे आला असता, महिलेचे वडील सुखपाल सिंग यांनी गुरप्रीत सिंगचा मुलगा अनमोल जोत सिंग आणि त्याचा साथीदार गुरबिंदर सिंग, सहज प्रीत सिंग यांच्यासह अज्ञात व्यक्तींनी, दोघांना मारण्याचा कट रचला आणि गुरप्रीत सिंग आणि गुरप्रीत कौर यांची हत्या केली. आरोपींनी दोघांना शेतात बोलावून त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार करत दोघांची हत्या केली.
यानंतर आरोपींनी दोघांचेही मृतदेह पोत्यात बांधून कारमध्ये ठेवले आणि भाक्रा कालव्यात फेकून दिले. गुरप्रीत कौरचा मृतदेह भाक्रा कालव्याच्या सरदुलगढ परिसरातून बाहेर पडणाऱ्या नाल्यातून सापडला होता, मात्र गुरप्रीत सिंगचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही.
प्रेयसीचे वडील सुखपाल सिंग घाबरले होते आणि त्यांनी आपल्या शेजारी राहणाऱ्या एका नगरसेवकाला या प्रकरणाची माहिती दिली. दरम्यान, नगरसेवकाने याची माहिती ही पोलिसांना दिली. पोलिसांनी गुरप्रीत कौरचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला. भाक्रा कालव्यात गुरप्रीत सिंगच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. पोलिसांनी हा गुन्हा करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
संबंधित बातम्या