Smoke Paan side-effect: लग्नसमारंभातील ट्रेंडी खाद्य पदार्थ ठेवणे आजकाल नवी बाब राहिली नाही. पाणी पुरी, साऊथ इंडियन, चायनीज या सारखे खाद्य पदार्थ ठेवले जातात. लग्नातील वऱ्हाडीमंडळी या पदार्थावर ताव मारत असतात. मात्र, कधी कधी हे खाद्य पदार्थ खाने जिवावर देखील बेतू शकते. अशीच एक घटना नुकतीच बेंगळुरूमध्ये घडली. एका लग्नात एका १२ वर्षाच्या मुलीने सुपारीचे 'स्मोक पान' खाल्ले. हे पान खाल्यामुळे तिच्या पोटात छिद्र पडले. हे प्रकरण इतके गंभीर झाले की, मुलीवर शस्त्रक्रिया करावी लागली आणि शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांना तिच्या पोटाचा मोठा भाग कापावा लागला.
ही घटना सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. बेंगळुरू येथील एचएसआर लेआउट, येथे एका १२ वर्षांच्या मुलीने लग्नाच्या रिसेप्शनमध्ये 'स्मोक पान' खाल्लं. या प्रकारच्या पानामध्ये द्रव नायट्रोजनचा वापर केला जातो. पान खाल्ल्यानंतर मुलीच्या पोटात अचानक दुखू लागले. काही वेळातच मुलगी वेदनेने तडफडू लागली. मुलीची प्रकृती बिघडत असल्याचे पाहून तिच्या पालकांनी तिला रुग्णालयात नेले. जेथे इंट्राऑपरेटिव्ह OGDoscopy द्वारे डॉक्टरांना मुलीच्या पोटात द्रव नायट्रोजन जास्त प्रमाणात असल्याने तिच्या पोटात छिद्र पडल्याचे दिसले.
नारायणा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले की, मुलीची ढासळलेली प्रकृती पाहून तातडीने शस्त्रक्रिया करावी लागली. सध्या मुलगी धोक्याबाहेर आहे आणि शस्त्रक्रिया यशस्वी झाली, परंतु ऑपरेशन दरम्यान, डॉक्टरांना आढळले की द्रव नायट्रोजनमुळे, तिच्या पोटात ४.५ सेमीचे मोठे छिद्र तयार झाले आहे. त्यामुळे तिच्या पोटाचा काही भाग कापावा लागला.
डॉक्टरांच्या मते, लिक्विड नायट्रोजन पोटात गेल्यास शरीराला मोठी हानी होते. त्यांनी सांगितले की नायट्रोजनचे द्रव प्रमाण शरीरात गेल्यास धोकादायक परिणाम होऊ शकतात. अशीच एक घटना २०१७ मध्ये गुरुग्राममध्ये घडली होती, जेव्हा एका व्यक्तीने द्रव नायट्रोजन असलेले कॉकटेल प्यायले होते. लिक्विड नायट्रोजन थंड असल्याने त्याचे त्वचेवर गंभीर परिमाण होतात. यामुले शरीराच्या अंतर्गत भागांचे नुकसान होते. हे आरोग्यासाठी खूप गंभीर धोका निर्माण करू शकते. डॉक्टरांनी सांगितले की, आजकाल लिक्विड नायट्रोजन लग्न आणि इतर पार्ट्यांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे, पण आधी आरोग्याला महत्त्व दिले पाहिजे.
संबंधित बातम्या