‘ब्रँड बेंगळुरू’चे प्रवर्तक व समर्थक म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते, माजी परराष्ट्रमंत्री व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सोमनाहळ्ळी मल्लय्या कृष्णा अर्थात, एस. एम. कृष्णा यांचं आज निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मालविका आणि शांभवी या दोन मुली आहेत. कृष्णा यांच्या निधनाबद्दल राजकीय वर्तुळात शोक व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दु:ख व्यक्त केलं आहे.
एसएम कृष्णा हे मूळचे काँग्रेसी होते. तब्बल ४५ वर्षांहून अधिक काळ काँग्रेसमध्ये काम केलेल्या कृष्णा यांनी २०१७ साली पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर ते भाजपमध्ये गेले होते. मात्र, वयोमानामुळं सक्रिय राजकारणात नव्हते. १ मे १९३२ रोजी जन्मलेले कृष्णा उच्च विद्याविभुषित होते. त्यांनी म्हैसूरच्या महाराजा कॉलेजमधून पदवी घेतली. बेंगळुरूच्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी मिळवली आणि नंतर अमेरिकेतील डलास येथील सदर्न मेथोडिस्ट युनिव्हर्सिटी आणि नंतर जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठात शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर भारतात त्यांनी बेंगळुरूच्या रेणुकाचार्य विधी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कायद्याचे प्राध्यापक म्हणून काम केलं. कालांतरानं ते राजकारणात सक्रिय झाले.
कृष्णा १९६२ मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर १९६८ व नंतरच्या निवडणुकीत ते लोकसभेवर निवडून गेले. मात्र, १९७२ साली त्यांनी राज्याच्या राजकारणात पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला. ते विधान परिषदेवर निवडून गेले, त्यानंतर (१९७२-१९७७) ते वाणिज्य, उद्योग आणि संसदीय कामकाज मंत्री झाले.
पुढं १९८० मध्ये कृष्णा यांनी लोकसभेत पुनरागमन केलं. त्यांनी १९८३ ते ८४ या काळात उद्योग राज्यमंत्री आणि १९८४ ते ८५ या काळात अर्थराज्यमंत्री म्हणून काम पाहिलं. १९८९ ते १९९२ या काळात ते कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष होते. त्यानंतर १९९६ मध्ये ते राज्यसभेवर निवडून गेले आणि ऑक्टोबर १९९९ पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य राहिले.
ऑक्टोबर १९९९ ते मे २००४ या कालावधीत कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर एस. एम. कृष्णा यांनी डिसेंबर २००४ मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला. कृष्णा यांनी आपल्या सहा दशकांच्या कारकिर्दीत तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील २००९-२०१२ च्या यूपीए सरकारमध्ये काही काळ परराष्ट्रमंत्री म्हणूनही काम पाहिलं.
विशेष म्हणजे काँग्रेससोबतचं ४६ वर्षांचं नातं तोडून २०१७ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. काँग्रेस संभ्रमावस्थेत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. २०२३ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वीच कृष्णा यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली होती.
कर्नाटकचे मुख्यमंत्री असताना 'ब्रँड बेंगळुरू'चे प्रवर्तक म्हणून एसएम कृष्णा ओळखले जातात. त्यांच्याच कार्यकाळात कॅलिफोर्नियाच्या सिलिकॉन व्हॅलीला पर्याय म्हणून बेंगळुरू आयटी हब म्हणून विकसित झालं आणि हजारो तरुणांना रोजगार मिळाला.
२०२२ मध्ये कृष्णा यांनी तत्कालीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना पत्र लिहून ‘ब्रँड बेंगळुरू’ साठी कठोर पावलं उचलून त्याचं संरक्षण करण्याची मागणी केली होती. कृष्णा सरकारनं १९९९ मध्ये स्थापन केलेल्या बेंगळुरू अजेंडा टास्क फोर्सची (बीएटीएफ) पुनर्रचना करण्याची सूचना त्यांनी केली होती. यात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश होता. जेणेकरून भविष्यकालीन दृष्टीकोन ठेवून शहराच्या विकासाचा आराखडा तयार केला जाईल. सार्वजनिक जीवनातील योगदानाबद्दल एसएम कृष्णा यांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
संबंधित बातम्या