Accident : कर्नाटकात भीषण अपघात, कंटेनर कारवर पलटल्याने सांगलीतील एकाच कुटूंबातील ६ जणांचा मृत्यू
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Accident : कर्नाटकात भीषण अपघात, कंटेनर कारवर पलटल्याने सांगलीतील एकाच कुटूंबातील ६ जणांचा मृत्यू

Accident : कर्नाटकात भीषण अपघात, कंटेनर कारवर पलटल्याने सांगलीतील एकाच कुटूंबातील ६ जणांचा मृत्यू

Dec 21, 2024 05:05 PM IST

Karnataka Accident : मोठा कंटेनर कारवर पडल्याने कारचा पार चक्काचूर झाला होता. कंटेनरच्या खाली दबलेल्या कारमधून प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले.

कंटेनर कारवर पलटला
कंटेनर कारवर पलटला

नाताळच्या सुट्टीसाठी गावी येत असलेल्या सांगलीतील एका कुटूंबावर काळाने घाला घातला. कर्नाटक राज्यातील नेलमंगळा येथे (आज) शनिवारी एक कंटेनर ट्रक कारवर पलटल्याने एकाच कुटुंबातील ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृत सांगली जिल्ह्यातील जतमधील असल्याचे माहिती आहे. या घटनेने जत तालुक्यावर शोककळा पसरली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना बेंगळुरुजवळ तळकेरे येथे घडली. एक कंटेनर ट्रक कारवर पलटला. कारमध्ये ६ व्यक्ती बसले होते. अपघातामुळे राष्ट्रीय महामार्ग- ४८ वरील वाहतूक विस्कळीत झाली होती. 

सांगलीमधील जत तालुक्यातील मोरबगी गावातील लोक बेंगळूरुला कामाला आहेत. नाताळच्या सुट्टीनिमित्त बेंगळुरूवरून आपल्या गावी परतत असताना हा भीषण अपघात झाला. कारमध्ये ६ जण होते ते जतमधील आपल्या गावाकडे येत होते. मात्र गावी पोहोचण्याआधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. तळकेरे येथे आल्यानंतर समोरून येणारा कंटेनर ट्रक कारवर पलटी झाली. या घटनेत कारमधील सर्व जणांचा मृत्यू झाला. सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याचे सांगितले जात आहे. 

चंद्रम इगाप्पागोळ (वय ४६), पत्नी धोराबाई इगाप्पागोळ (४०), मुलगा गण इगाप्पागोळ (१६), मुली दिक्षा (१०), आर्या (६), चंद्रम एगाप्पागोळ यांच्या भावाच्या पत्नी विजयालक्ष्मी (३५) अशी मृतांची नावे आहेत. चंद्रम इगाप्पागोळ हे मूळचे सांगलीच्या जत तालुक्यातील मोराबागी गावातील रहिवासी आहेत. ते बेंगलोर येथे सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीला होते. 

तुमकूर-बेंगळूरु राष्ट्रीय महामार्गावरील बेंगळुरू ग्रामीण जिल्ह्यातील नेलमंगला तालुक्यातील तळकेरे गावाजवळ ही दुर्घटना घडली. अपघातानंतर महामार्गावर १० किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मोठा कंटेनर कारवर पडल्याने कारचा पार चक्काचूर झाला होता. कंटेनरच्या खाली दबलेल्या कारमधून प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. ओव्हरलोड माल लादल्य़ाने कंटेनर पलटी झाला. ३ क्रेनच्या सहाय्याने लॉरी बेल्ट आणि साखळी वापरून कंटेनर उचलण्यात आला.

इगाप्पागोळ कुटुंब वीकेंडच्या सुट्टीमुळे KA-01-ND-१५३६ क्रमांकाच्या SUV मधून सांगलीच्या दिशेने निघाले होते. कंटेनर ट्रकच्या समांतर जात असताना कंटेनर उलटला. कार कंटेनरखाली अडकून पार चक्काचूर झाला. 

चंद्रागप्पा इगाप्पागोळ यांनी बेंगळूरूमध्ये IAST सॉफ्टवेअर सोल्युशन्स कंपनीची स्थापना केली होती. या कंपनीत सुमारे ३०० लोक काम करत होते. इगाप्पागोळ यांनी दोन महिन्यांपूर्वी एक लक्झरी व्होल्वो कार (KA 01 ND 1536) खरेदी केली होती. ही एक उच्च श्रेणीची कार असून ज्याची किंमत सुमारे १ कोटी रुपये आहे. वीकेंड ट्रिपला जात असताना ही दुर्घटना घडली.

 

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर