six people died due to smoke in delhi : राजधानी दिल्ली सध्या कडक्याची थंडी पडत आहे. या थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरीक शेकोटीचा आधार घेत आहेत. मात्र, शेकोटी पेटवणे नागरिकांच्या जिवावर बेतत आहे. काही दिवसांपूर्वी शेकोटीमुळे घरात गुदमरून पती पत्नीचा मृत्यू झाला होता, तर २ महिन्यांचा मुलाची प्रकृती गंभीर होती. ही घटना ताजी असतांना दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये २ मुलांसह ६ जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सकाळी शेजाऱ्यांनी त्यांचा मृतदेह पाहिल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. या घटनेची माहिती शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले.
दिल्लीत थंडीपासून वाचण्यासाठी शेकोटी पेटवून झोपण्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला आहे. पहिली घटना ही इंद्रपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली, तर तर दुसरी अलीपूर येथील आहे. रात्री कडक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी या लोकांनी शेकोटी पेटवली होती. मात्र, धुरामुळे झोपतेच गुदमरून नागरिकांचा मृत्यू झाला.
इंद्रपुरी येथील घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये वडील आणि मुलाचा समवेवह आहे. तर अलीपूरमध्ये ४ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. यामध्ये पती, पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. हे कुटुंब रात्री शेकोटी पेटवून झोपले होते. सकाळी शेजाऱ्यांनी त्यांचे मृतदेह पाहिल्यानंतर घबराट पसरली. या घटनेची माहिती शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना दिली.
पोलिसांनी सांगितले की, शनिवारी सकाळी ६.४० वाजता त्यांना त्यांना ४ लोक घरात बेशुद्ध असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून घराची खिडकी तोडून आत प्रवेश केला असता, चौघांचा मृत्यू झाला असल्याचे समजले. दरम्यान, त्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
यापूर्वी दिल्लीतील द्वारका येथेही अशीच एक घटना उघडकीस आली होती. यात एका जोडप्याचा मृत्यू झाला होता. तर त्यांचा दोन महिन्यांचा मुलाची प्रकृती ही गंभीर झाली होती. शेकोटीत कोळसा आणि लाकूड जाळल्याने कार्बन मोनोऑक्साइड तयार होतो. बंद खोलीत शेकोटी पेटवली तर कार्बन मोनॉक्साईडचे प्रमाण वाढून ऑक्सिजनचे प्रमाण कमी होतो. ज्यामुळे मेंदूवर परिणाम होतो आणि श्वासाद्वारे कार्बन शरीरात पसरतो. यामुळे मृत्यू ओढवतो.