Siliguri Safari Park: सिलीगुडी सफारी पार्कमध्ये 'अकबर' नावाच्या सिंहाला 'सीता' नावाच्या सिंहिणीसोबत कथितपणे ठेवण्यात आल्यानंतर विश्व हिंदू परिषदेच्या बंगाल शाखेने वनविभागाविरोधात कलकत्ता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर आज कलकत्ता उच्च न्यायालयात सुनावणी झाली आणि न्यायालयाने पश्चिम बंगाल राज्य सरकारला दोन्ही सिंहांचे नाव बदलण्याचे आदेश दिले.
सिंहिणीला सीता असे नाव देण्यास आक्षेप घेणाऱ्या विश्व हिंदू परिषदेच्या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायमूर्ती सौगत भट्टाचार्य यांच्या एकसदस्यीय खंडपीठाने राज्य सरकारला विनंती केली की, हा वाद मिटण्यासाठी या दोन्ही सिंहांना दुसरे काही नावे देण्याबाबत विचार करावा. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने म्हटले की, देशातील बहुसंख्य लोक सीतेची पूजा करतात आणि अकबर हा कुशल शासक आणि यशस्वी मुघल सम्राट होता.
न्यायमूर्ती भट्टाचार्य म्हणाले, "मिस्टर काऊन्सिल, तुम्ही स्वत: तुमच्या पाळीव प्राण्याचे नाव एखाद्या हिंदू देव किंवा मुस्लिम पैगंबरांच्या नावावर ठेवाल का? मला वाटते, जर आपल्यापैकी कोणी अधिकारी असता, तर आमच्यापैकी कोणीही त्यांचे नाव अकबर आणि सीता ठेवले नसते. आपल्यापैकी कोणी एखाद्या प्राण्याला रवींद्रनाथ टागोर यांचे नाव देण्याचा विचार करू शकेल का? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला.
"सीतेची पूजा या देशातील एक मोठा वर्ग करतो. सिंहाला अकबराचे नाव देण्यासही विरोध आहे. ते एक कार्यक्षम, यशस्वी आणि धर्मनिरपेक्ष मुघल सम्राट होते, असे न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, राज्य सरकारने उच्च न्यायालयात सांगितले की, दोन सिंहांची नावे त्रिपुरा प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी २०१६ आणि २०१८ मध्ये पश्चिम बंगालमध्ये हस्तांतरित करण्यापूर्वी ठेवली होती.
सिंहांना एकत्र ठेवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला विश्व हिंदु परिषदने विरोध केला होता. दोन सिंहांना एकत्र ठेवणे हा हिंदूंचा अपमान आहे, असा युक्तिवाद करत सिंहिणीचे नाव बदलण्याची मागणी करण्यात आली. सात वर्षांच्या आशियाई सिंह आणि पाच वर्षांच्या आशियाई सिंहिणीला त्रिपुरातून उद्यानात आणण्यात आले होते.
महत्त्वाचे म्हणजे, भारतीय प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना भारतीय देवी- देवतांची नावे देण्याची ही पहिलीच वेळ नाही. दिल्ली प्राणिसंग्रहालयात सीता नावाची पांढरी वाघीण आहे. मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानातील चित्ताला भारतीय अग्नी देवता अग्नीचे नाव देण्यात आले आहे.
संबंधित बातम्या