National Anthem Compulsory in JK Schools : जम्मू-काश्मीर शालेय शिक्षण विभागाने केंद्रशासित प्रदेशातील सर्व शाळांमध्ये सकाळच्या सभेत राष्ट्रगीत अनिवार्य केले आहे. शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांनी एका परिपत्रकाद्वारे हे निर्देश दिले आहेत, ज्यात सर्व शाळांना निर्देश दिले आहेत की, दिवसाची सुरूवात राष्ट्रगीताने व्हावी.
सकाळच्या सभेची सुरुवात मानक प्रोटोकॉलनुसार राष्ट्रगीताने (national anthem) व्हायला हवी. केंद्रशासित प्रदेशातील शाळांमध्ये ही प्रथा एकसारखी पाळली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे, असे बुधवारी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. विद्यार्थ्यांमध्ये एकता आणि शिस्तीची भावना वाढीस लावण्यासाठी सकाळच्या सभा अमूल्य ठरल्याचे विभागाने नमूद केले आहे.(national anthem now mandatory in all Jammu and Kashmir)
राष्ट्रगीत नैतिक अखंडता, सामायिक समुदाय आणि मानसिक शांतता या मूल्यांची जोपासना करण्यासाठी व्यासपीठ म्हणून काम करतात. मात्र, जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील विविध शाळांमध्ये अशा प्रकारची महत्त्वपूर्ण परंपरा समानपणे पार पाडली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे, असे परिपत्रकात म्हटले आहे.
सकाळच्या सभेमध्ये शाळांनी काही अतिथी वक्त्यांना आमंत्रित करणे आणि पर्यावरण आणि अंमली पदार्थांच्या समस्येविषयी जनजागृती करण्याची शिफारस ही विभागाने केली आहे. सकाळची प्रार्थना २० मिनिटे चालेल, शाळेच्या दिवसाच्या सुरुवातीला सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी निर्धारित ठिकाणी एकत्र येणे आवश्यक आहे, असे निर्देशही शाळांना देण्यात आले आहेत.
शिक्षकांना महान व्यक्ती आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या आत्मचरित्रांवर चर्चा करणे, शालेय कार्यक्रम आणि उपक्रमांविषयी दररोज घोषणा करणे आणि विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी आणि सकारात्मक सूर लावण्यासाठी प्रेरणादायी भाषणे देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या परिपत्रकानुसार, मानसिक शक्ती आणि निरोगी जीवनशैलीला चालना देण्याच्या उद्देशाने तणाव व्यवस्थापन आणि आरोग्य विषयक टिप्स, सांस्कृतिक उत्सव आणि विविध संस्कृती आणि ऐतिहासिक घटनांबद्दल जाणून घेण्याचा समावेश सकाळच्या संमेलनात केला जाईल.
दयाळूपणा, वैविध्य किंवा पर्यावरण विषयक जनजागृती असे साप्ताहिक किंवा मासिक विषय सकाळच्या संमेलनात समाविष्ट करावेत, असे शालेय शिक्षण विभागाने परिपत्रकात म्हटले आहे.
संबंधित बातम्या