Viral news : गाझियाबादच्या लोनी बॉर्डर भागात शुक्रवारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. काही ग्राहकांनी एका ज्यूस दुकानदाराला ज्यूसमध्ये लघवी मिसळताना रंगेहात पकडले. यानंतर त्यांनी आरोपी दुकानदाराला चांगला चोप दिला. यानंतर त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. तपासादरम्यान आरोपीच्या दुकानातून एक कॅनही जप्त करण्यात आला आहे. ज्यात मानवी मूत्र ठेवण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी दुकानदाराला अटक केली आहे.
आमिर खान असे आरोपीचे नाव असून त्याच्या वडिलांचे नाव साबीर खान आहे. त्यांचे 'खुशी ज्यूस अँड शेक कॉर्नर' नावाने दुकान ज्यूसचे दुकान आहे. या प्रकरणी पोलिसांनी आमीरसह एका अल्पवयीन साथीदारालाही अटक केली आहे. याबाबत माहिती देताना एसीपी अंकुर विहार भास्कर वर्मा यांनी सांगितले की, शुक्रवारी सायंकाळी इंद्रापुरीतील काही लोकांना कॉलनीतील खुशी ज्यूस कॉर्नर येथील दुकानदार लघवी मिसळून ग्राहकांना ज्यूस देत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी दुकानात जोर ज्यूस ऑर्डर केला. यावेळी आमीर हा एका कॅनमध्ये असलेले मानवी मूत्र हे ज्यूसच्या ग्लासमध्ये मिसळत असल्याचं दिसलं. त्यांनी दुकानदार आमीरला रंगेहात पकडल्यावर त्याला चांगला चोप दिला. यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली.
या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून दुकानात तपासणी केली असता एका कॅनमध्ये सुमारे एक लिटर मानवी मूत्र आढळले. हा व्यक्ति हे मानवी मूत्र ज्यूसमध्ये मिसळून ग्राहकांना देत होता. याबाबत आरोपी दुकानदाराला विचारणा केली असता तो पोलिसांना कोणतेही समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. त्यानंतर पोलिसांनी आरोपी दुकानदार आमिर आणि त्याच्या १५ वर्षांच्या साथीदाराला अटक केली. पोलिसांनी कॅन जप्त करून तपासासाठी पाठवले.
एसीपी म्हणाले की, आरोपी आणि त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे की, दुकान चालक आमिर आणि त्याच्या साथीदाराने सर्वांसमोर लघवी मिसळल्याचे कबूल केले आणि माफीही मागितली. या घटनेचे काही व्हिडिओही समोर आले आहेत, ज्यामध्ये आरोपी दुकानदाराच्या कृत्यामुळे संतप्त झालेले लोक त्याला मारहाण करताना दिसत आहेत.