Brazil Plane Crash: ब्राझीलच्या साओ पाउलो राज्यातील एका शहराच्या निवासी भागात भीषण विमान दुर्घटना झाली आहे. या अपघतात ६२ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. विमान कंपनीने जारी केलेल्या निवेदनात सर्व प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. हे विमान साओ पाउलोच्या ग्वारुलोस आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी निघाले होते. निवेदनानुसार, विमानात ५८ प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. मात्र, विमानाचा अपघात कसा झाला हे समजू शकलेले नाही. या घटनेचा व्हिडिओ देखील काहींनी मोबाइलमध्ये कैद केला आहे.
विमानातील सर्व प्रवासी मृत्युमुखी झाल्याचा दावा येथील माध्यमांनी सुद्धा केला आहे. ब्राझीलच्या साओ इथे हा भीषण अपघात झाला. सरकारने मृतांच्या आकड्याबाबत अधिकृत माहिती दिली नाही. मात्र ६२ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक मीडियाने माहिती दिली आहे. हे विमान विनहेड सिटीजवळ खाली कोसळले. यावेळी विमानाचा वेग जास्त होता.
राष्ट्राध्यक्ष लुईस इनासिओ लुला दा सिल्वा यांनी दक्षिण ब्राझीलमधील एका कार्यक्रमात या घटनेबद्दल शोक व्यक्त केला. ते म्हणाले की, विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी मृत झाले आहेत. अग्निशमन विभाग, लष्करी पोलीस आणि नागरी संरक्षण प्राधिकरणाने विन्हेडो येथील अपघातस्थळी पथके पाठवली असून बचावकार्य सुरू आहे. ब्राझीलच्या टेलिव्हिजन नेटवर्क ग्लोबोन्यूजने घरांनी भरलेल्या निवासी भागात विमानाचे पडलेले तुकडे व त्यांना लागलेली आग याचे वृत्त दाखवले आहे.
फ्लाइट अवेअरने दिलेल्या माहितीनुसार, व्होपास फ्लाइट २२८३ हे ब्राझीलमधील कॅस्कॅव्हेल येथून ब्राझीलमधील साओ पाउलो येथे जात होते. सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी कॅस्कॅवेलहून निघालेले हे विमान दुपारी १ वाजून ४० मिनिटांनी साओ पाउलोयेथे उतरणार होते. फ्लाइटअवेअरने सांगितले की, हे विमान एटीआर एटीआर-७२ होते.
शुक्रवारी हलेल्या या दुर्घटनेचा व्हिडिओ काही नागरिकांनी मोबाइलमध्ये कैद केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला असून काही वेळातच तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. काही नेटकऱ्यांनी या अपघातात कुणीही वाचले नसावे अशी शक्यता व्यक्त केली.
या विमानाचे तुकडे येथील काही घरांवर कोसळले आहेत. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात आग लागली आहे. या आगीचे व धुराचे लोट दूर पर्यंत दिसत होते. घटनास्थळी अग्निशामक दल आणि बचाव पथक पोहोचले असून बचाव कार्य राबविले जात आहे.